अहमदनगर -जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांनी मानवी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या प्रकार वाढल्याची दखल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली असून बिबट्यांना पकडण्यासाठी अधिक पिंजरे प्राप्त करुन घेण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्याचबरोबर, बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे टाळण्यासाठी शेतीला दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीसंदर्भात राज्य शासनाने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. जिल्ह्यासाठी आतापर्यंत ७३ कोटी ५० लाख रुपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित निधी लवकरच प्राप्त होऊन वितरित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, कोरोना काळात सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांनी ५० लाख रुपयांचा धनादेश आणि कृतज्ञतापत्र प्रदान केले.
राज्य शासनाच्या वर्षपूर्तीच्या काळात ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण महाराष्ट्रासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासाठी स्व. आर.आर. पाटील सुंदर गाव योजना कार्यान्वित करण्यात आली असून त्यासाठी गावांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत दुप्पट वाढ केल्याची माहिती त्यांनी दिली.