पुणे विभागात 1 लाख 75,000 कोटींचे प्रोजेक्ट ! पुणे – सातारा रोडवर डबल डेकर; पुणे – शिरूर 56 Km चा नवा मार्ग तर पुणे – नाशिक महामार्गावर..

0

पुण्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे 40 हजार कोटींचे पूल उभारण्यात येतील. शिवाय, पुणे – बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

एनडीए चौकातील (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प अर्थात चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे, तसेच खेड व मंचर रस्ता चौपदरीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, चांदणी चौक प्रकल्पासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अनेक अडचणींवर मात करून, या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मलेशिया, सिंगापूर इथल्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा उड्डाणपूल करण्यात आला आहे. चांदणी चौकातील प्रकल्पासाठीही या निर्णयाचा उपयोग झाला. या रस्त्यांसाठी मेधा कुलकर्णी यांनी प्रयत्न केले आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही चांगले काम केल्याचे गडकरी म्हणाले.

पुणे – सातारा महामार्गावरील दुमजली पूल, हडपसर – यवत उन्नत मार्ग, पुणे शिरूर – अहमदनगर 56 किलोमीटरचा मार्ग, तळेगाव – शिक्रापूर – चाकण 54 किलोमीटरचा मार्ग आणि नाशिक फाटा – खेड मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार आहे.

पुणे विभागात पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प देण्यात आले असून, त्यातील काही पूर्ण झाले आहेत. 12 हजार कोटींचे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग डिसेंबरअखेर पूर्ण होतील असे गडकरी यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामुळे प्रवाशांच्या वन संख्येत वाढ होत आहे. पुणे मेट्रोने ‘पुणे कार्ड’ द्वारे चांगली सुरुवात केली आहे. हे कार्ड पीएमपीलाही लागू होईल अशी व्यवस्था करावी. भविष्यात देशातील इतर मोठ्या शहरांतही या कार्डचा उपयोग होऊ शकेल. पुण्यात एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करून 500 मीटरवर नागरिकांना विविध वाहतूक पर्याय दिल्यास ते सार्वजनिक वाहतुकीचा जास्त उपयोग करतील. आता स्मार्ट सिस्टीम तयार करण्यात येणार असल्याने बसेसची वेळ, स्थान, प्रवासी संख्याही कळू शकेल.

चांदणी चौकातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी आणि प्रकल्पाच्या आवश्यक भूसंपादनासाठी महानगरपालिकांना निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक भूसंपादनासाठीही निधी देण्यात आला आहे पुरंदरला विमानतळ होण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्व मान्यता मिळाल्या आहेत.

भूसंपादनासाठी लवकरच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेण्यात येईल. पुण्यातील अनेक क्लस्टरसाठी हे कार्गो वरदान ठरेल. मुळा – मुठा शुद्धीकरण प्रकल्पामुळे शहरातील आणि शेतीसाठी पाण्याची समस्या दूर होईल. पुण्यातील कचरा व्यवस्थापन आणि विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून भविष्यात पुणे देशातील सुंदर आणि राहण्यायोग्य शहर होईल, असेही फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोच्या कामालाही गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वनाज ते चांदणी चौक आणि वाघोलीपर्यंतही मेट्रो कमीत कमी कालावधीत पोहोचवायची आहे. पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग येत असल्याने रस्ते, मेट्रो, विमान वाहतूक अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. पुणे अंतर्गत चक्राकार मार्गाची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार दिलीप मोहिते – पाटील, आमदार माधुरी मिसाळ, आमदार राहुल कुल, आमदार सुनील कांबळे, आमदार संजय जगताप, आमदार सिद्धार्थ शिरोळे विभागीय आयुक्त सौरभ राव, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, राष्ट्रीय कदम आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, शहरात मेट्रोच्या दुसरा टप्प्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सकाळी 6 पासून मेट्रोची फेरी सुरू केल्यास सकाळी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल. डॉ गोऱ्हे म्हणाल्या, एनडीए चौकातील प्रकल्पामुळे नागरिकांना चांगली सुविधा झाली आहे.

महामार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी आमदार भीमराव तापकीर यांनीही मनोगत व्यक्त केले. केंद्र आणि राज्याने प्रकल्पासाठी पुरेसा निधी दिल्याने चांदणी चौकातील रस्ते प्रकल्प पूर्ण होऊन वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत झाली असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव यांनी केले. महामेट्रोतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘पुणे वन कार्ड’ चे लोकार्पणही या वेळी करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.