व्वा रं पठ्ठया..! शेतकऱ्याने देशी जुगाड करून चक्क ट्रॅक्टरला बनविले मिनी JCB, इतका आला खर्च, शेतीचे सर्व कामे झटपट लागतात मार्गी..

0

सध्याच्या यांत्रिक, वैज्ञानिक युगात नेमके कोण काय डोके लावेल सांगता येत नाही. एका ट्रॅक्टर मालकाने देशी जुगाड लावत चक्क ट्रॅक्टरचे मिनी जेसीबीत रूपांतर केले आहे. जेसीबी जे काम करते तेच काम मिनी जेसीबी करते. कमी पैशात सहज, सोपे कामे मिनी जेसीबीने होत असल्याने या जेसीबीला शेतकऱ्यांतून मोठी मागणी आहे.

जत तालुक्यापासून जवळच असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील हे मिनी जेसीबी सध्या जतसह मंगळवेढा परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. लवंगी येथील विनित सिद्धप्पा वसबिरे यांनी हा मिनी जेसीबी जत एमआयडीसी येथील नदाफ इंडस्ट्रीज येथे बनवून घेतला आहे. विनित वसबिरे यांनी साडेसात लाखाचा नवीन ट्रॅक्टर खरेदी केला. त्या ट्रॅक्टरला पुढची फळी बसवली तर, मागील बाजुला जेसीबीला ज्या पद्धतीने बकेट असते ते बकेट बसवण्यात आले. चालकाची बैठक व्यवस्थाही जशी जेसीबीची असते अगदी तशीच बनविण्यात आली आहे.

चालकाची सीट पुढे पाठीमागे फिरते. त्यामुळे हा मिनी जेसीबी सहज ऑपरेट होतो. जेसीबीमध्ये मागे – पुढे फिरण्यासाठी ज्या पद्धतीची खुर्ची असते तशी खुर्ची त्या ट्रॅक्टरमध्ये तयार करण्यात आली आहे. सावलीसाठी लोखंडी पत्र्याचे शेड खुर्चीच्या वरच्या बाजूला तयार करण्यात आले आहे.

ट्रॅक्टरवर बसविण्यात आलेली पुढची फळी व बकेट यांचा नियोजनबद्ध सागाडा तयार करण्यात आला आहे. फक्त सहा लाखांमध्ये हे काम करण्यात आले आहे.

स्वतंत्र कंट्रोल रूम..

ट्रॅक्टरच्या पुढच्या बाजुला जी फळी बसवली आहे ती फळी ट्रॅक्टर हे ट्रॅक्टरच्या इंजिनावर चालते. तर जेसीबीच्या मागील बकेट चालविण्यासाठी चालकाच्या उजव्या बाजूला ऑईलची टाकी बसविण्यात आली आहे. हे ऑईल छोट्या पाईपने चालकाच्या मागील बाजूस असणाऱ्या कन्ट्रोल युनिटला पुरविले जाते. कंट्रोल युनिटपासून हायड्रोलिक सिस्टीमने हवं तसं मिनी जेसीबी चालविला जातो. हायड्रोलिक सिस्टीमुळे जेसीबीची जी ताकद आहे तीच ताकद या मिनी जेसीबीमध्ये निर्माण झाल्याने काम करताना कोणतीही अडचण येत नाही.

शेतकऱ्यांसाठी ठरतेय उपयुक्त..

जेसीबी हा शेतात चालविण्यासाठी अडचणींचा ठरतो मात्र ट्रॅक्टर शेतात चालविणे सहज शक्य होते. त्यामुळे ट्रॅक्टरला बनविलेला हा मिनी जेसीबी शेतीच्या कामासाठी उपयुक्त ठरत आहे. शेतातील माती, खत काढणे, पाईपलाइनला चर पाडणे, डाळिंब व इतर फळबागांचे खड्डे पाडणे यासह शेतीतील दुरुस्तीची कामे सहज करता येतात. एखादे जनावर दगावले तर त्याला उचलून नेण्यासाठीही याचा उपयोग होतो.

एक पाऊल पुढे..

जमीन लेव्हलिंग करायची झाल्यास नुसते जेसीबी लावले तर होत नाही. जेसीबी हे दगड काढू शकतो पण लेव्हलिंग करू शकत नाही. या मिनी जेसीबीला बकेट असल्याने दगड काढता येतात. तसेच थेट ट्रॅक्टरची पुढची फळी असल्याने जमीन लेव्हलिंगही होते. तासाभरासाठी जेसीबी शेतातील कामासाठी यायचा झाले तर ते त्याला परवडत नाही पण मिनी जेसीबी सहज उपलब्ध होतो.

जेसीबीला ताशी एक हजार भाडे आहे तर , मिनी जेसीबीला 800 रुपये भाडे आकारले जाते. शेतकरी व ट्रॅक्टर मालक या दोघांच्याही खिशाला परवडणारे मिनी जेसीबी जेसीबीच्या ही एक पाऊल पुढे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.