यंदा खरीप हंगामातील नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या उत्पादनात अतिवृष्टीमुळे निम्मी घट झाली असली तरी दुसरीकडे मात्र टोकण पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीनचे प्रतिकूल परिस्थीतीतही विक्रमी उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग सताळा येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
निम्म्या उत्पादन खर्चात दुप्पट उत्पादन घेतले आहे. उदगीर तालुक्यातील सताळा येथील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख असलेले यशवंत पाटील हे दर वर्षी शेतीत वेगवेगळा प्रयोग करुन तो यशस्वी करतात. यंदा त्यांनी 3 एकरात टोकण पद्धतीने सोयाबीनची लागवड करुन ती यशस्वी करुन दाखवली आहे.
अल्प उत्पादन खर्चात दुप्पट उत्पादन काढले आहे. एकरात लागणाऱ्या बियाणात 3 एकर क्षेत्राची लागवड झाली आहे. साडेतीन फुटाच्या अंतराने बेड पाडून त्यावर पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर टोकण मशिनने सोयाबीनची लागवड करण्यात आली..
एकरी फक्त नऊ किलो बियाणे लागले असून कोळपणी व अंतर मशागतीचा खर्च कमी झाला आहे. पाटील यांनी 3 एकर रानात टोकण पद्धत वापरली असून 3 एकरात 50 क्विंटल सोयाबीन निघाले आहे.
तसेच एकरला लागणाऱ्या काढणीच्या खर्चात 3 एकरवरील सोयाबीन काढून निघाले आहे. यामुळे कोळपणी, बियाणे व काढणीच्या खर्चात साठ ते सत्तर टक्के बचत झाली असून उत्पादनात मात्र पेरणी केलेल्या सोयाबीन पेक्षा दुप्पट उत्पादन निघाले आहे.
विशेष म्हणजे लागवड केलेल्या सोयाबीनला अतिवृष्टी अथवा पावसाच्या खंडतेचा कसलाही परिणाम होत नसून मेहनतीचा खर्च सुद्धा कमी लागतो. यामुळे यंदा पेरणीपेक्षा लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला असून निम्म्या उत्पादन खर्चात दुप्पट उत्पादन निघाले आहे.
सताळा येथील प्रगतशील शेतकरी यशवंत पाटील यांनी आपल्या शेतीत अधुनिक तंत्रज्ञान वापरुन दर वर्षी उत्पादन वाढीचा वेगवेगळा प्रयोग यशस्वी केला असून त्यांना गेल्या वर्षी कृषी विभागाने पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधुनिक पद्धतीने शेती केल्यास निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थीतीतही विक्रमी उत्पादन काढता येते ते दाखवून दिले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निसर्गाच्या प्रवाहासोबत राहून अधुनिक शेतीचा अवलंब करावा यामुळे उत्पादनात नक्कीच वाढ होईल, असे यशवंत पाटील यांनी यांनी सांगितले.