Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रातील आणखी 3 जिल्हे समृद्धी महामार्गाला जोडणार! रस्ते, दळणवळण क्षेत्रात होणार मोठे बदल; ‘या’ गावांतून जाणार रस्ता, पहा रोडमॅप..

महाराष्ट्राची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर यांना जोडणारा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संकल्पनेतून साकार झालेला अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आता आणखी 3 जिल्ह्यांना जोडला जाणार आहे.

समृद्धी महामार्ग नावाचा अँक्सेस कंट्रोल्ड नागपूर – मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे – हा आता राज्याच्या एका टोकापासून पश्चिमेला मुंबईपासून पूर्वेला गडचिरोलीपर्यंत जाणारा पहिला रस्ता ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड (MSRDC) ने पूर्व महाराष्ट्र द्रुतगती मार्ग (EME) या नावाने नागपूर जिल्ह्यातून गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांपर्यंत समृद्धी महामार्गाचा विस्ताराचा शासन निर्णय बांधकाम विभागाचे अप्पर सचिव राहुल गिरीबुवा यांनी जारी केला आहे..

MSRDC ने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातून गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंतचे संरेखन निश्चित झालेले असून सल्लागाराद्वारे त्यावर काम केलं जात आहे कारण हा पूर्णपणे नवीन रस्ता आहे. सध्या नागपूरपासून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती – घुग्धूस – राजुरा मार्गे गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव (गोर) पर्यंत नेण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

हा समृद्धी महामार्ग तीन पॅकेज मध्ये होणार असून नागपूर ते गोंदिया (पॅकेज 1), भंडारा ते गडचिरोली (पॅकेज 2) व नागपूर ते चंद्रपूर (पॅकेज 3) अंतर्गत प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम MSRDC मार्फत हाती घेण्यात आले आहे.

नैसर्गिक खनिज साधनाने समृद्ध असलेल्या गोंदिया आणि गडचिरोली हे माओवादग्रस्त आणि आदिवासी जिल्हे आहेत. पायाभूत सुविधांचा विकास आणि दुसरी राजधानी, राज्याचे इतर भाग आणि मुंबई यांच्याशी सुलभ कनेक्टिव्हिटी यामुळे या जिल्ह्यांमध्ये कृषी आणि औद्योगिक उत्पादनाला चालना मिळेल. तसेच माओवाद्यांना आळा घालण्यासही मदत होणार आहे.

गडचिरोलीत स्पंज आयर्न मुबलक प्रमाणात आहे. या प्रकल्पाद्वारे होणारी वाहतूक जिल्ह्यातील आणि राज्यातील इतर भागातील अनेक उद्योगांना मोठा दिलासा देणारी ठरू शकते.

समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 900 किमी पेक्षा जास्त होईल. सध्या, 10 जिल्ह्यांमध्ये 120 मीटर रुंदीचा 701 किमीचा द्रुतगती मार्ग आहे. नवीन प्रकल्प सुमारे 194.397 कि. मी. अंतराचा असण्याची शक्यता असून आणखी तीन जिल्हे जोडले जाणार असून, भंडारा जिल्ह्यातील काही भागही एक्स्प्रेस वेवर येण्याची शक्यता आहे.

कसा असणार हा महामार्ग..

समृद्धी एक्सप्रेसवरील वर्धा जिल्ह्याच्या सेलडोह इंटरचेंजवरून भद्रावती – घुग्घुस ते राजुरा हा मार्ग जोडला जाणार आहे. पुढे हा हैदराबाद महामार्गावरील गडचिरोली जिल्ह्याच्या नवेगाव मोरपर्यंत पोहोचेल.

या मार्गाची एकूण लांबी 182.428 कि. मी. असणार आहे. समृद्धीलाच जोडणारा घुग्घूस इंटरचेंज ते चंद्रपूर जोडरस्ता 11.969 कि. मी. असा एकूण 194.397 कि. मी. अंतराचा हा रस्ता असल्याचे शासन परिपत्रकात नमूद केलं आहे.