Take a fresh look at your lifestyle.

शासनाकडून शेतकऱ्यांची चेष्टा ; जिरायतीला हेक्टरी 13,600 रु. जाहीर केले, पण खात्यावर फक्त 6,800 जमा !

अतिवृष्टी व गोगलगाईंच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीची मदत म्हणून मोठा गाजावाजा करत सरकारने हेक्टरी 13,600 रुपये मदत जाहीर केली. परंतु प्रत्यक्षात मात्र नुकसान कमी दाखवून हेक्टरी केवळ 6,800 रुपयेच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार असल्याने पेरणीचाही खर्च निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागला. सुरुवातीलाच गोगलगाईंचा मोठा प्रदुर्भाव होऊन उभे सोयाबीनचे पीक फस्त झाले, तर उरले-सुरले ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळ नष्ट झाले. त्याच पावसात काही ठिकाणी पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. एकंदरीत 80 ते 90 पीक नष्ट होऊन शेतीचे नुकसान झाल्याने त्यांनी जमिनीवर नांगर फिरवला.

नुकसानीची राजकीय नेते व प्रशासनाच्यावतीने पाहणी करण्यात आली. नुकसानीबाबत शेतकऱ्यांना सरकर मदत जाहीर करेल, असे वाटत असताना सरकारने जिरायतीला हेक्टरी 13,600 रुपये मदत 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जाहीर केली.

त्यात निलंगा तालुक्यातील पानचिंचोली, निलंगा, मदनसुरी व भुतमुगळी या चार महसूल मंडळाचा सहभाग करण्यात आला. किमान पेरणीचा तरी खर्च निघेल, अशी अशा शेतकऱ्यांना लागली असताना प्रत्यक्षात मदतीच्या याद्यामधील आकडेवारी पाहून शेतकऱ्यांना धक्काच बसला.

13,600 परंतु प्रत्यक्षात मात्र हेक्टरी 6,800 ते 7000 हजार रुपये मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. हेक्टरी पेरणीचा खर्च 20 हजार रुपयेच्या घरात आहे. शेतात चिमटूभर रास होणार नाही अन् सरकारने आशा लावून तुटपुंजी मदत जाहीर केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

50 ते 60 टक्केच नुकसानीचे क्षेत्र दाखवा असा आदेशच वरुन आल्याची कुजबुज महसूल प्रशासनातून ऐकावयास येत होती, ती बाब खरी ठरली. महसूल व कृषी विभागानेही प्रत्यक्षात पंचनामे न करता सरसकट मदत दिल्याने ज्या शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसान झाले, त्यांना मोठा फटका बसल्याचे बोलत जात आहे.

हत्ती सांगून उंदीर भेट :-

गोगलगाय आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेडोळ व शिवणी कोतल परीसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला. सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा वाटत होती. सरकारने मोठा गाजावाजा NDRF च्या नियमात बदल करून 13,600 जाहीर केले, पण प्रत्यक्षात 50 टक्केच रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याने हत्ती सांगून उंदीर भेट दिल्याचाच प्रकार केला आहे. शेतकऱ्यांचा बियाणांचाही खर्च निघाला नसून हि तर शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे मत शिवणी, कोतल येथील शेतकरी महेश शेळके यांनी व्यक्त केले.