Take a fresh look at your lifestyle.

बारामतीच्या शेतकऱ्याचा विक्रम…एकरी घेतले 138 टन ऊस उत्पादन, एका उसाला 50 कांड्या, पहा कोणत्या जातीची केली लागवड ?

शेती परवडत नाही.. असं म्हणणाऱ्या हजारो शेतकरी बांधवांना चपराक देत पारंपरिक शेतीला आधुनिकतेची व कल्पकतेची जोड दिल्याने एक एकर शेतीत सुमारे 138 टन विक्रमी उत्पादन घेत संपूर्ण राज्यात एक आदर्श निर्माण केलेल्या शेतकऱ्याचे नाव ॲड. संजय यशवंत जगताप आहे.

दरम्यान, थेट माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी कौतुकाची थाप टाकल्याने जगताप यांना गगन ठेंगणे झाले आहे. सहकारातील अग्रेसर असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद असलेले ॲड. संजय जगताप यांची पणदरे भागातील सोनकसवाडीमध्ये शेती असून त्यांनी एक एकरात सुमारे 138 टन उत्पादन घेतले आहे.

मशागत व योग्य बियाणे :-

आपल्या शेतात यापूर्वी केळीचे पीक होते. ते पीक निघाल्यावर त्यांनी को – 86032 जातीच्या ऊस रोपांची निवड केली. तत्पूर्वी सात फुटीच्या सऱ्या काढून तब्बल 4200 ऊस रोपे लावली. प्रत्येक रोपात सुमारे दीड फूट इतके अंतर ठेवले होते. सदर रोपे ही सांगली जिल्ह्यातील आष्टामधून आणली होती.

योग्य नियोजन व औषधांचा वापर : –

ऊस रोपे लावल्यानंतर त्यांची उगवणी झाल्यावर दर्जेदार खते वापरली. त्यांची तगारणी झाल्यावर रासायनिक खते, ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी व खते दिली. तसेच, रोपांना योग्य सूर्यप्रकाश व खेळती हवा मिळाल्याने उसाच्या कांड्यांची वाढ चांगली झाली. कांड 10 ते 12 व 20 ते 22 वर आल्यावर दोनदा उसाचे पाचट काढले. परिणामी, 45-50 कांड्यांपर्यंत परिपक्व उस तयार झाला.

ऊस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन :-

विक्रमी उत्पादन घेताना माळेगाव कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांनी वेळोवळी केलेले मार्गदर्शन उपयोगी ठरले. तसेच कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिलेले सल्ले फायदेशीर ठरले.

यशात कुटुंबाचा वाटा :-

व्यावसायाने निष्णांत कायदेतज्ज्ञ असणारे ॲड. संजय जगताप हे पुण्यात वकिली करतात. त्यांना व त्यांची दोन मुले धीरज व तेजस यांना शेतीची आवड असल्याने सर्वाच्या कष्टाच्या जोरावर हे यश मिळाले आहे. असे ॲड. संजय जगताप सांगतात.

4 लाख 83 हजारांचा विक्रमी फायदा :-

माळेगाव कारखान्याने सभासदांना राज्यात विक्रमी असा प्रतिटन 3411 रुपये दर दिला आहे. यामुळे 138 टन उसासाठी 4 लाख 83 हजार रुपये मिळाले असून एकूण खर्च वगळता सुमारे साडेतीन लाख रुपये नफा मिळाल्याचे सांगितले.

खा. शरद पवार थेट बांधावर : –

तब्बल 138 टन ऊस उत्पादन घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गोविंदबागेत मुक्कामी असणाऱ्या माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी थेट बांधावर जाऊन ॲड. संजय जगताप यांची यशोगाथा ऐकली. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, कारखान्याचे अध्यक्ष अँड. केशव जगताप, ऊस विकास, अधिकारी सुरेश काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

शेतकरी ॲड. संजय जगताप यांचे हे यश पाहून त्यांच्या सारखे हजारो शेतकरी निर्माण झाले पाहिजे. त्यांनी मिळवलेले यश शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे. यामुळे शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून शेती समृद्ध केली पाहिजे. देशाला अशा शेतकऱ्यांची नितांत गरज आहे.

– खा. शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री

पारंपरिक शेती करण्याऐवजी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. आज आमच्या मेहनतीचे चीज झाले असून खा. शरद पवार यांनी केलेले कौतुक आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देते. त्यांच्या भेटीने मनोबल उंचावले.

– ॲड. संजय जगताप, शेतकरी, सोनकसवाडी, माळेगाव, ता. बारामती