Take a fresh look at your lifestyle.

मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत कोस्टल रोड ‘या’ दिवशी होणार खुला ! मुलुंड -घोडबंदर मेट्रोचे 61% काम पूर्ण, मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती..

कोस्टल रोडचा पहिला टप्पा जानेवारी 2024 मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईतील वाहतूककोंडीची समस्या बऱ्याच अंशी सुटणार आहे. हा कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह ते वरळी पर्यंत आहे, त्याची लांबी 10.58 किमी आहे. त्याच्या बांधकामावर बीएमसीने 13 हजार कोटी रुपये खर्च केले आहे.

शनिवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत CSR उत्कृष्टता पुरस्कार, 2023 कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 22 किमी लांबीच्या MTHL मार्गावरील वाहतूक देखील जानेवारीतच सुरू होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो-4 कॉरिडॉरमधील 7 स्टेशन्स चमकावण्यासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

पॅकेज C-09 अंतर्गत तयार होत असलेल्या 7 स्टेशन्सच्या फिनिशिंग कामावर ही रक्कम खर्च करण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार, मेट्रो – 4 मार्गावरील गरोडिया नगर मेट्रो स्टेशन ते सूर्या नगर मेट्रो स्टेशनपर्यंत प्लंबिंग, स्ट्रक्चरल वर्क, फॅब्रिकेशन आणि आर्किटेक्चरल कामांवर सुमारे 200 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

मुंबई ते ठाणे मेट्रोच्या माध्यमातून जोडण्यासाठी मेट्रो 4 बांधण्यात येत आहे. वडाळा – कासारवडवली – गायमुख दरम्यान मेट्रो – 4 आणि मेट्रो – 4A बांधण्यात येत आहेत. मेट्रो-4 चे बांधकाम 58 टक्के पूर्ण झाले असून मेट्रो- 4A चे काम 61 टक्के पूर्ण झाले आहे..

मेट्रो – 4 कॉरिडॉरचे काम होणार सुरु..

ठाणे ते मुंबईला जोडणाऱ्या मेट्रो मार्गावरील सेवा दोन टप्प्यात सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात मुलुंड ते घोडबंदर दरम्यान मेट्रो धावणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) 2025 पर्यंत मेट्रो – 4 कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यावर मेट्रो सेवा सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे. या मेट्रो मार्गाच्या संपूर्ण मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 2026 – 27 पर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते..

कोकण मंडळाच्या सोडतीची तारीख वाढवली..

महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) कोकण मंडळाने बांधलेल्या घरांची लॉटरी 13 डिसेंबर रोजी जाहीर करणार होती, मात्र प्रशासकीय कारणास्तव लॉटरीची तारीख वाढवल्याची माहिती मंडळाने दिली आहे. लॉटरीची नवी तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे कोकण मंडळाकडून सांगण्यात आले.

याबाबतची माहिती अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे उपलब्ध करून दिले जाईल. कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या नोंदणीची प्रक्रिया सप्टेंबरपासून सुरू आहे. एकूण 30,678 जणांची नोंदणी झाली आहे. यापैकी 24,303 अर्जदारांनी विहित मुदतीत अनामत रक्कम जमा केली आहे. अर्जदारांची अंतिम यादी 4 डिसेंबर रोजी ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हाडाच्या वेबसाइटवर अर्जदार त्यांची नावे तपासू शकतात. या सोडतीत ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग येथील घरांचा समावेश करण्यात आला आहे.