Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर ! राज्यात ‘लेक लाडकी’ योजनेला सुरुवात, मुलींना मिळणार 1 लाखांपर्यंत लाभ; या 5 कागदपत्रांसह इथे करा अर्ज..

केंद्र व राज्य शासनाद्वारे मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. त्यातील माझी कन्या भाग्यश्री या योजनेनंतर आता दि. 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी ‘लेक लाडकी’ ही योजना सुरू करण्यात आली आहे.

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींची संख्या वाढविणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, बालविवाह थांबविणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे, मुलींमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करून शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रोत्साहित करणे, एकूणच मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘लेक लाडकी’ योजना राबविली जात आहे. या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने ही योजना राबविण्याबाबतचा शासन निर्णय दि. 30 ऑक्टोबर रोजी काढला आहे. पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार, इयत्ता पहिलीत गेल्यानंतर सहा हजार, सहावीत गेल्यानंतर सात हजार..

अकरावीत गेल्यानंतर आठ हजार व 18 वर्षांची झाल्यानंतर 75 हजार रुपये असे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार असल्याचे मित्तल यांनी सांगितले.

1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुली वा एक मुलगा व दुसरी मुलगी वा दुसऱ्या वेळेस जन्माला आलेल्या जुळ्या मुली यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे व पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक राहील.

आवश्यक कागदपत्रे :-

पिवळे किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका
मुलीच्या पालकांचे आधार कार्ड
आई – वडिलांसोबत मुलीचा फोटो
अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
रहिवासी दाखला
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
ई – मेल आयडी
बँक पासबुक

अर्ज कुठे कराल ?

यासाठी लाभार्थ्यांनी नजीकच्या अंगणवाडी केंद्रात किंवा तालुक्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात संपर्क करून अर्ज सादर करावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांनी केले आहे.