Take a fresh look at your lifestyle.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ, 4 महिन्यांच्या थकबाकीसह खात्यात जमा होणार इतके पैसे..

महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शिंदे सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात आला आहे. यासोबतच जुलै महिन्यापासून कर्मचाऱ्यांना डीएची थकबाकीही रोखीने दिली जाणार आहे.

राज्य शासनाने शासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही 4 टक्क्यांची वाढ केली आहे. ही वाढ जुलै ते ऑक्टोबर 2023 या 4 महिन्यांच्या थकबाकीसह नोव्हेंबर महिन्याच्या वेतनात रोखीने मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान 1 हजार तर अधिकाऱ्यांच्या पगारात किमान 3 हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.

सातव्या वेतन आयोगांतर्गत महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जानेवारी 2023 पासून चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तेव्हापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7 व्या CPC अंतर्गत 42 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. कारण महागाई भत्ता (DA) वर्षातून दोनदा वाढवला जातो. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी होत होती.

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही त्यात वाढ करण्याची मागणी होत होती. अखेर राज्य सरकारने DA वर निर्णय घेतला आणि महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवून 46 टक्के केला..

निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार लाभ.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सरकारी निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतन महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनाच्या एकूण रकमेवर 1 जुलैपासून 4 टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. ही वाढ 1 जुलै, 2023 पासूनच्या थकबाकीसह माहे नोव्हेंबर 2023 च्या निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. तसेच ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे, अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी – कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांमधील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे.

साधारणपणे, डीए आणि डीआर (निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलेली) वाढ दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये होते. ही वाढ विविध महागाईच्या आकडेवारीवर आधारित आहे. आता पुढील 120 दिवसांत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 50 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे..