Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Rain : आनंदाची बातमी ! पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी..

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असे संकेत भारतीय हवामान विभागाने (IMD) दिले आहेत. झारखंडवरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून ते सध्या चक्रीय स्थितीत आहे. तसेच सिक्कीम ते दक्षिण महाराष्ट्र म्हणजेच विदर्भ मराठवाड्यापर्यंत कमी दाबाची रेषा सक्रिय झाली आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्रात कमी – अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे. (Maharashtra Rain Update)

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस..

सप्टेंबरमध्ये तीन आठवडे पावसाने दडी मारली असली तरी पुढील आठवड्यात पाऊस पडणार आहे. आयएमडी पुणे कार्यालयातील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, रायगड, गोंदिया, भंडारा आणि नागपूर विभागातील बहुतांश भागात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल. 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

25 – 26 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस.

मात्र, 25 आणि 26 सप्टेंबर रोजी राज्यभर मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पाऊस पडेल. पुण्यात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहील. दिवसा हलका ते खूप हलका पाऊस पडेल. तसेच सोमवार आणि मंगळवारी घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कश्यपी यांनी वर्तवली आहे.

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस..

दरम्यान, पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान हलका पाऊस झाला. सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर उष्माही वाढला. चार वाजण्याच्या सुमारास ढग दाटून आले आणि काही वेळातच उपनगरात पहिला पाऊस सुरू झाला.