Take a fresh look at your lifestyle.

Pune -Mumbai Expressway : ‘मिसिंग लिंक’ प्रोजेक्टच्या कामाला गती, जगातील सर्वात रुंद बोगदा ‘या’ दिवशी होणार खुला..

पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगावदरम्यान सुरू असलेल्या असलेल्या ‘मिसिंग लिक’ प्रकल्पांतर्गत 1.67 किलोमीटर आणि 8.92 किलोमीटर लांबीच्या दोन बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या 180 मीटर उंच असलेल्या दरी पुलाच काम 100 मीटरपर्यंत पूर्ण झाले असून, पुढील वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ( एमएसआरडीसी) ठेवले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन बोगद्यांचे 95% टक्के काम पूर्ण झाले आहे. 23 मीटर रुंदीचे दोन्ही बोगदे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे बोगदे असून त्यात 4 लेन आहे.

पुणे – मुंबई द्रुतगती मार्ग व पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात आणि खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहापदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते.

येथे घाट व चढ – उताराचे प्रमाण जास्त असून, दरडी कोसळण्याचे प्रकारही पावसाळ्यात होतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे.

का खास आहे हा बोगदा ?

6695 कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा हा बोगदा प्रोजेक्ट स्वतःच खूप खास आहे. या बोगद्याची रुंदी 23.75 मीटर आहे, ज्यामुळे हा जगातील सर्वात रुंद बोगदा बनला आहे. या बोगद्यात आग लागू नये यासाठी अधिक चांगल्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या बोगद्याच्या उभारणीमुळे मुंबई – पुणे हे अंतर तासाभराने कमी होणार आहे.

बोगद्याच्या आत दगड पडू नयेत यासाठी ठिकठिकाणी रॉक बोल्ट तयार करण्यात आले असून प्रत्येक 300 मीटरवर एक्झिट पॉईंट रोड आहे. आग लागल्यास, हाय प्रेशर वाटर मिक्स सिस्टम त्वरित कार्यान्वित केली जाणार आहे.