Take a fresh look at your lifestyle.

भर उन्हात आभाळ फाटलं..! शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, 9 ते 11 एप्रिलपर्यंत ‘या’ जिल्ह्यांना अवकाळीसह गारपिटीचा इशारा..

राज्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने पुन्हा विदर्भ, मराठवाडा, कोकणासह राज्याच्या अनेक भागांत धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या गव्हासह संत्रा, द्राक्ष, आंबा, डाळिंब या पिकांसह वीज पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती राज्याच्या आपत्कालीन विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

अवकाळी पावसाने शुक्रवारी दुपारनंतर विदर्भात बुलढाणा नागपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत हजेरी लावली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतात असलेल्या पिकांचे नुकसान केले.

अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील तुलंगा, दिग्रस परिसरात गारपीट, तर बाळापूर तालुक्यातील वाडेगाव, तामशी, चिंचोली, पिंपळगाव, तर अकोला तालुक्यातील देगाव परिसरात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

गारांसह पडणाऱ्या पावसामुळे कोकणासह राज्यात सर्वत्र आंबा, लिंबू, गहू, कांदा पिकांचे नुकसान झाले. गारपिटीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

कांदा, भुईमूगालाही पावसाचा फटका बसला आहे. पावसाच्या पाण्याने नाल्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच पावसाचा इशारा दिला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांमध्येसुद्धा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे येथील प्रमुख पिके आंबा, काजू बागायतदार संकटात येण्याची भीती निर्माण झाली आहे. नागपूरसह विदर्भात पडलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या चिंता मात्र वाढल्या आहेत.

दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस..

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला आहे. दरम्यान , पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारे यामुळे राज्यावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील साताऱ्यामध्ये 10 मिमी, तर महाबळेश्वरमध्ये 0.7 मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भातील अनेक शहरांना पावसाने झोडपले.

बुलढाण्यामध्ये 34 मिमी इतका मुसळधार पाऊस पडला. तसेच नागपूर 11 , वर्धा 5 , यवतमाळ 5 तर अकोल्यामध्ये 2 मिमी पावसाची नोंद झाली. राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. काहा भागात 40 किमी वेगाने वारे वाहत होते.

पावसामुळे मध्य महाराष्ट्र , मराठवाडा व विदर्भातील शहरांच्या कमाल तापमानात घट झाली. राज्यात सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरीत 39.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वरमध्ये 16 अंश सेल्सिअस इतके होते.

8 व 9 एप्रिल रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा इशारा आहे. त्यानंतर 10 ते 11 एप्रिल रोजीही राज्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.