Take a fresh look at your lifestyle.

Soyabean Mosaic : सोयाबीनवर मोझॅक अटॅकने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर ! कसे मिळवाल मोझॅक व्हायरसवर नियंत्रण ?

खरीपातील नगदी पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकावर शेवटच्या टप्यात पिवळ्या मोझॅक (हळद्या) विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादनात आणखी घट होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत. सध्या बाजारपेठेत भाव खाणारे सोयाबीन शेतात मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेचे कारण बनले आहे.

यावर्षी पूर्ण पावसाळयात जेमतेम पाऊस झाला. यामुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली. तसेच उत्पादनावर मोठा फटका बसला आणि त्यात भर म्हणून आता या सोयाबीन पिकांवर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. दरवर्षी पाचोड (ता.पैठण) मध्ये सोयबीन पीक मोठया प्रमाणावर घेतले जाते. मोझॅक अटॅक

मात्र यावर्षी पावसाने तब्बल तीन दांडी मारल्यामुळे सोयविनचे मोठे नुकसान झाले आहे, त्यावेळी शेतकऱ्यांनी कसेबसे आपली सोयबीन टिकवून ठेवली. त्यावर आता मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना विविध कंपनीची महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे.

लागवडीवर मोठा खर्च शेतकरी हजारो रुपये उत्पादनावर खर्च करून अस्मानी संकटांना तोंड देत सोयाबीन पीक हे शेवटच्या टप्यात असताना त्यावर हळद्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे पाचोडसह मुरमा, कोळीबोडखा थेरगाव, दादेगाव, लिंबगाव, रांजणगाव दांडगा, केकत जळगाव, चौंढाळा, विहामांडवा, कडेठाण, वडजी, अंतरवाली खांडी, आडगाव जावळे, राजापूर, आडूळ, हर्षी, सोनवाडी, इनायपूर, खादगाव परिसरात पाहायला मिळत आहे.

मध्यंतरी फुले आणि शेंगा लागायच्या वेळेस पावसाचा मोठा खंड पडला होता. त्याचवेळी उत्पादनात घट होणार हे निश्चित. त्यानंतर झालेल्या मोठया पावसामुळे सोयाबीनवर हळद्या विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. रोगग्रस्त झाडांवरील शेंगांची संख्या कमी होऊन त्यात लहान आकाराचे दाणे भरतात किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहित व पोचट उपजतात व पर्यायाने उत्पादनात लक्षणीय घट येते.

दरम्यान, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असलेल्या पिकावर एकामागोमाग एक संकटे येत असल्याने येथील शेतकरी चिंतेत आहेत. त्याच मागील आठ ते दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे सध्या सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आता कृषी विभागाने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावं तसेच झालेल्या नुकसानीची पाहणी करून मोबदला द्यावा अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

लक्षणे :-

– झाडांची पाने आकाराने लहान होतात. पानांचा काही भाग हिरवट तर काही पिवळसर दिसून येतो.
– पानांच्या शिराजवळ पिवळ्या रंगांचे डाग दिसतात.
– प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते.
– पाने सुरकत्या पडून ती ओबडधोबड होतात.
– लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास, संपूर्ण झाड पिवळे पडतात. अशा झाडांना फुले व शेंगा कमी लागतात. शेंगामध्ये दाणे भरत नाहीत किंवा आकाराने लहान दाणे भरतात. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते.

रोगवाहक किडींचे नियंत्रण :-

रोगवाहक किडींच्या प्रतिबंधासाठी शेतामध्ये निळे व पिवळे सापळे एकरी 25 या प्रमाणे पिकाच्या समकक्ष उंचीवर लावावेत.

– उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी निंबोळी अर्क (5 टक्के) किंवा

अझाडिरेक्टीन (3000 पीपीएम) 1 मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या (अर्थात गरजेनुसार) घ्याव्यात..

रासायनिक फवारणी ( प्रमाण : प्रतिलिटर पाणी – नॅपसॅक पंपासाठीचे प्रमाण) ..

– थायामेथोक्झाम (12.6 टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (9.50 टक्के झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) 0.25 मिलि किंवा
– बीटा सायफ्लुथ्रीन (8.49 टक्के) अधिक इमिडाक्लोप्रिड (19.81 टक्के डब्ल्यू ओडी) (संयुक्त कीटकनाशक) 0.7 मिलि किंवा
– ॲसिटामिप्रीड (25 टक्के) अधिक बायफेन्थ्रीन (25 टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त कीटकनाशक) 0.25 ग्रॅम..