Take a fresh look at your lifestyle.

जिल्ह्यातील 37 गावांना आता ‘सौर’ऊर्जेचे बळ ! सोलर पॅनलसाठी मिळतंय तब्बल 3 लाख 12 हजारांचे अनुदान..

शासकीय कामकाज करताना ऑनलाइन कामांवरच अधिक भर दिला जात आहे. ग्रामपंचायत कार्यालयांमध्येही शासनाच्या विविध योजनांची माहिती, विविध दाखले रोजगार हमी योजना व ग्रामपंचायत अंतर्गत येणारी सर्व माहिती चुटकीसरशी ऑनलाइन मिळत आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भारनियमनाची अडचण लक्षात घेता अपारंपरिक ऊर्जा साधने योजनेअंतर्गत सौर वीज निर्मिती संयंत्र बसविल्याने जिल्ह्यातील 37 ग्रामपंचायत कार्यालये विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत.

यामध्ये बिगर आदिवासी भागातील 15 व आदिवासी भागातील 22 ग्रामपंचायतींचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे देण्यात आली आहे.

अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांवर आधारित ऊर्जा निर्मिती साधनांच्या विकासामध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, सद्यःस्थितीमध्ये वीज निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेले कोळसा, तेल, नैसर्गिक वायू आदी पारंपरिक इंधनसाठे दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात वीज वापराऐवजी पारंपरिक ऊर्जेच्या कमीत कमी वापराला प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सौर ऊर्जेचा वापर दैनंदिन जीवनात वाढविणे गरजेचे होत आहे.

या अनुषंगाने शासन स्तरावरून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विविध प्रकारचे संगणकीकृत दाखले, शासकीय योजनांची माहिती आता ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र, हे दाखले व माहिती मिळविताना ग्रामस्थांना वीज भारनियमनाचा मोठा फटका बसतो. ही बाब लक्षात घेत, राज्य शासनाने ग्रामपंचायत कार्यालये विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावीत, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अपारंपरिक ऊर्जा साधने योजना सुरू केली आहे.

यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयास सौर वीज निर्मितीचे दोन किलो वॉटपर्यंतचे संयंत्र अनुदानावर देण्यात आले आहेत. बिगर आदिवासी भागाकरिता दहा टक्के, तर आदिवासी भागाकरिता पाच टक्के लाभाथी हिस्सा आहे. यात जिल्ह्यातील बिगर आदिवासी भागातील 15 ग्रामपंचायत कार्यालये विजेच्या बाबतीत आता स्वयंपूर्ण झाली आहेत.

अशी आहे योजना

एका संयंत्रास 3 लाख 29 हजार रुपये इतका खर्च येतो. त्यापैकी 32 हजार 900 रुपये लाभार्थी हिस्सा ग्रामपंचायतीला भरावा लागतो. तर 2 लाख 96 हजार 100 रुपये अनुदान दिले जाते. आदिवासी भागात एकूण खर्च 3 लाख 29 हजार रुपयांपैकी ग्रामपंचायतीचा लाभार्थी हिस्सा 16 हजार 450 इतका असून, तीन लाख 12 हजार 550 रुपये अनुदान दिले जाते.

सौर वीज निर्मिती सयंत्र बसविण्यात आलेल्या ग्रा.प.

(बिगर आदिवासी भाग) :-

हट्टी (ता. चांदवड) , रातीर , रामतीर (ता . बागलाण), डुबेरे , विंचूर दळवी (ता . सिन्नर) , राहुरी , जाखोरी (ता . नाशिक), रायपूर (ता . चांदवड), जळगाव खुर्द , हिसवळ (ता . नांदगाव), कोटमगाव खुर्द, जळगाव नेऊर (ता. येवला), वाहेगाव (दहेगाव, ता. निफाड), गारेगाव, नांदगाव बुद्रुक (ता. मालेगाव).

आदिवासी भाग (नाशिक प्रकल्प) :-

ओझरखंड , दहेगाव (ता. नाशिक) , हिरडी, रोहिले, वाळवंड (ता. त्र्यंबकेश्वर), जळे, देवगाव, म्हसगण (ता. पेठ ), बरखेडा, खतवड, नानाशी (ता . दिडोरी). कळवण प्रकल्प : बगडू, मळगाव खुद कोसुड (ता. कळवण), बोरगाव बाधघोंड, उंबरपाड़ा दि (ता. सुरगाणा), खडकतळे. माळवाडी (ता. देवळा), अतापूर, जामाटी, मानूर (ता . बागलाण)