Take a fresh look at your lifestyle.

Ahmednagar MIDC : अहमदनगर जिल्ह्यात आणखी 2 एमआयडीसींना मंजुरी ! येथे होणार ५०० व ६०० एकरावर कंपन्या..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात नवउद्योग आणि नवरोजगार निर्मितीच्या दृष्टीने नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यासाठी नव्या दोन नवीन एमआयडीसींना तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, भविष्यात नगरमध्ये रोजगारनिर्मितीत वाढ होऊन तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचा उद्योग विभाग, महसूल विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शेती महामंडळाची महत्त्वाची बैठक मंगळवारी सह्यादी अतिथीगृह येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री विखे – पाटील यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर विखे यांनी ही माहिती दिली. (Ahmednagar MIDC)

या बैठकीस महसूल विभाग, उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शेती महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्याचा विकास होण्यासाठी नवीन उद्योगास चालना मिळावी बेरोजगारांच्या हातांना काम मिळावे तसेच गावातील स्थानिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नगर जिल्ह्यातील विस्तारित एमआयडीसीसंदर्भात मागणी केली होती.

त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यासाठी वडगाव गुप्ता, विळद येथे ६०० एकरावर फेज – २ व शिर्डी येथे साईबाबा शिर्डी एमआयडीसी अशा ५०० एकरवर दुसऱ्या एमआयडीसीला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्त्वतः मंजुरी दिल्याची माहिती विखे – पाटील दिली.

शासनाच्याच जमिनीवर भूसंपादनाविना विकसित करण्यात येणारी ही राज्यातील पहिलीच एमआयडीसी असल्याचे विखे – पाटील यांनी सांगितले. तसेच या बैठकीत जुन्या एमआयडीसीसंदर्भातील निंबळक एमआयडीसी येथील समांतर रस्त्याला, सुपा एमआयडीसीला ५० कोटींचे अद्ययावत असे अग्निशमन (फायर) स्टेशन तसेच अंतर्गत रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. तसेच इतर विविध विषयांवर सकारात्मक चर्चा पार पडल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.