Take a fresh look at your lifestyle.

2014 मध्ये प्रत्येक भारतीयावर होतं ₹43,124 कर्ज अन् आता 2023 मध्ये होणारा कर्जाचा ‘हा’ आकडा पाहून चक्रावून जाल !

शेतीशिवार टीम : 28 ऑगस्ट 2022 : मोदी सरकारच्या कार्यकाळात देशातील प्रत्येक नागरिकावरील कर्ज सुमारे 152 टक्क्यांनी वाढलं आहे. तसेच कर्जबाजारी उद्योगपती गौतम अदानी यांना दोन वर्षांत नियमांची पायमल्ली करत सुमारे 48 हजार कोटींचे कर्ज दिलं असल्याची बाबही समोर आली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी प्रसारमाध्यमांशी विशेष चर्चेत हे आरोप केले. यादरम्यान, अमेरिकेतील एका संशोधन संस्थेच्या अहवालाचा हवाला देत गौरव वल्लभ यांनी गौतम अदानी यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाबाबतही केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत त्यांनी न्यूयॉर्कस्थित क्रेडिट रिसर्च फर्मच्या क्रेडिट रिसर्च रिपोर्टचा हवाला देऊन सांगितले की, ‘हम दो, हमारे दो’ सरकारच्या नंबर- 1 व्यक्ती असलेल्या अदानीवरील एकूण कर्ज ₹ 2.30 लाख कोटी आहे. अदानी समूहाला हे कर्ज कोणाच्या शिफारशीनुसार मिळतंय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

2020 ते 2022 या वर्षांमध्ये अदानीने सुमारे 48 हजार कोटींचे कर्ज घेतलं, त्यापैकी सुमारे 18 हजार कोटींचे कर्ज एसबीआयकडून मिळालं आहे. त्यांनी सांगितले की, अदानी समूह कर्जात बुडाला असल्याचं रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलं आहे. तसेच अदानी समूह नवीन अन-नुभवी व्यवसायात उतरत जात असून ज्यासाठी त्याला आणखी कर्ज घ्यावे लागणार आहे.

अर्थशास्त्र आणि आर्थिक विषयातील तज्ञ गौरव वल्लभ यांनी सांगितले पुढे सांगितले की, 2014 मध्ये सरकारच्या कर्जामुळे प्रत्येक भारतीयावर ₹ 43,124 चे कर्ज होते, 2023 च्या आर्थिक वर्षात हे कर्ज प्रत्येक ₹1,09,000 पर्यंत वाढणार आहे. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या कारभारामुळे प्रति भारतीय कर्ज 152% वाढले आहे.

आर्थिक वर्ष 2011-12 मध्‍ये देशाच्‍या प्रत्‍येक नागरिकावर 33 हजाराचे कर्ज होतं. तर मार्च 2012 मध्‍ये प्रति व्‍यक्‍ती कर्ज 32812 रूपये कर्ज होतं.2014 पासून मोदी सरकार आल्यापासून हे कर्ज लाखांच्या घरात गेलं असल्याने भारतही आर्थिक दिवाळखोरीत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेस प्रवक्ते प्रोफेसर गाैरव वल्लभ यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे….

1) 2014 ला देशावर 55.9 लाख कोटी रुपये कर्ज होते. मोदी सरकारने ताज्या अर्थसंकल्पात नमूद केले आहे की, 2023 ला हे कर्ज तब्बल 152.17 लाख कोटी होईल.

2) 2014 मधे प्रत्येक भारतीयावर 43124 रुपये कर्ज होते ते वाढून 2023 मधे 109000 रुपये होईल. मोदी सरकारच्या कुप्रबंधनामुळे देशावरचे कर्ज 152% वाढले आहे.

3) न्युयाॅर्कच्या क्रेडिट रिसर्च फर्मने त्याच्या रिसर्च रिपोर्टमधे म्हटले आहे की, अदानीवर तब्बल 2.30 लाख कोटी रुपये कर्ज आहे.

4) अदानी समूह कर्जात बुडालेला असूनही त्याला नवनवे कर्ज मिळत आहे. या समूहाला कर्ज कोण देते हे तपासले पाहीजे.

5) 2020 ते 2022 या दोनच वर्षात अदानी समूहाने 48000 कोटी रुपये नवे कर्ज घेतले आहे, यातील 18770 कोटी रुपये कर्ज एकट्या SBI ने दिले आहे.अदानीच्या कर्जामुळे भारतीय बँका धोक्यात आहेत.

6) स्वत:चे भांडवल अजिबात न लावता अदानी समूह काैशल्य नसलेल्या, त्यांना अनुभव नसलेल्या क्षेत्रातही गुंतवणूक करत आहे, ज्यामुळे कर्ज देणार्‍या बँका धोक्यात येऊ शकतात. अदानी एंटरप्रायजेस व अदानी ग्रीनवर एकूण 94400 कोटी रुपये कर्ज आहे.