Take a fresh look at your lifestyle.

8 किमी लांब, 17.6 मीटर रुंद आणि 9.12 मीटर उंच..! देशातला सर्वात रुंद बोगदा महाराष्ट्रात बनवून तयार, कधी कराल प्रवास ?

देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची उपराजधानी यांना जोडणारा मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. वाहने वेगाने पुढे जाण्यासाठी महामार्गावर देशातील सर्वात रुंद दुहेरी बोगदा तयार करण्यात आला आहे. सर्वात रुंद बोगदा असण्यासोबतच हा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा देखील बनला आहे.

8 किमी लांब, 17.6 मीटर रुंद आणि 9.12 मीटर उंच अशा या बोगद्याचे बांधकाम अंतिम मुदतीपूर्वी 3 महिने पूर्ण झालं आहे. नाशिक ते ठाणे दरम्यान अनेक डोगर-रांगा आहेत. महामार्गावरील इगतपुरी – कसारा घाट ओलांडण्यासाठी वाहनांना 25 ते 30 मिनिटे लागतात, तर समृद्धी महामार्गावरील या बोगद्यामुळे वाहने केवळ 6 ते 7 मिनिटांत दुर्गम घाट ओलांडू शकणार आहे.

यामध्ये 8 किमी दुहेरी बोगदा, 2 किमी लांबीचा व्हायाडक्ट आणि 3 किमी लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. बोगदा आणि व्हायाडक्टच्या माध्यमातून वाहने अवघ्या 5 ते 7 मिनिटांत ठाण्यात पोहोचू शकणार आहेत..

20 मजली इमारती एवढी उंची.. 

बोगदा एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगराला जोडण्यासाठी 20 मजली इमारतीच्या उंचीवर एक व्हायाडक्ट बांधण्यात आला आहे. यापैकी एक वायडक्ट 910 मीटर आणि दुसरा 1,295 मीटर उंच आहे. बोगद्याच्या बांधकामादरम्यान देशात प्रथमच हाय प्रेशर वॉटर मिस्ट सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत बोगद्यात आग लागल्यास किंवा तापमान 60 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यास अग्निशमन यंत्रणा आपोआप काम करू लागेल. प्रवासादरम्यान प्रवाशांना इंटरनेट सुविधा देण्यासाठी बोगद्याच्या आत लीकी केबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाणी अडवण्यासाठी बांध बांधून केलं गेलं काम.. 

इगतपुरी हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस असलेला भाग आहे. बोगदा इंगतपुरीच्या अगदी जवळ आहे आणि जवळच एक नदी आहे, त्यामुळे महामार्गाचे पॅकेज -14 तयार करणाऱ्या कंपनीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पावसाळ्यात काम सुरू ठेवण्यासाठी कंपनीला जागेजवळच धरण बांधावे लागले. Afcons इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट मॅनेजर शेखर दास यांच्या म्हणण्यानुसार, भविष्यातही बोगद्यात पाणी भरणार नाही, हे लक्षात घेऊन सुरुवातीला 200 मीटर लांबीचा शेड बोगदा बांधण्यात आला आहे..

आपातकालीन मार्गाची सुविधा.. 

8 किमी लांबीचे जुळे बोगदे एकमेकांना जोडण्यासाठी 26 पासिंग पॅसेज तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर बोगद्यात आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी 500 मीटर लांबीचा आपत्कालीन बोगदाही बांधण्यात आला आहे. या बोगद्यातून समृद्धी महामार्गावरून जुन्या मुंबई – नाशिक महामार्गावर जाता येणार आहे. शेखर यांच्या म्हणण्यानुसार, पॅकेज -14 चे काम पूर्ण केल्यानंतर हा विभाग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (MSRDC) सोपवण्यात आला आहे.