Take a fresh look at your lifestyle.

सर्वसामान्य जनता माझ्यासोबत, विक्रमी मतांनी विजयी होणार ! आ. निलेश लंके यांचा विजयाबद्दल आत्मविश्‍वास..

गेल्या 50 वर्षापासूनच्या विखे कुटुंबाच्या कुट नितीला सर्वसामान्य जनता कंटाळली असून मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वसामान्य जनता माझ्या सोबत आहे. त्यामुळे मी या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होईल असा आत्मविश्वास आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आपण साधेपणाने अंध, अपंग बांधव तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून निवडणूक जिंकण्याचा मला विश्‍वासच नाही तर यश हे आपलेच असल्याचा आत्मविश्‍वास आ. नीलेश लंके यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव हे अर्ज दाखल करताना उपस्थित होते.

अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर दररोज फिरत आहात. विजयाबाबत विश्‍वास वाटतो का असे पत्रकारांनी विचारले असता लंके म्हणाले, विश्‍वासच नाही यश आपलेच आहे. धनशक्ती विरूध्द जनशक्ती अशी ही निवडणूक आहे.

लंके म्हणाले, अंध, अपंग तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांचे नेते अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्यात आला असून हनुमानरायांकडे मी प्रार्थना केली की नगर दक्षिण मतदारसंघातील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी मला बळ द्या. मतदार संघातील दिन दुबळयांचे आश्रू पुसण्यासाठी मला, सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी या निवडणूकीला सामोरे जात असल्याचे लंके यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आवाहन केले की, मंगळवारी हनुमान जयंतीच्या दिवशी नागरीकांनी महाविकास आघाडीच्या रावणारूपी लंकेचे दहन करण्याचा निश्‍चय करावा. यासबंधी प्रश्‍न विचारण्यात आला असता लंके म्हणाले, कुठलाही नेता आल्यानंतर व्यासपीठावरून बोलताना त्यांच्या पक्षाची बाजू मांडत असताना टीका केल्यानंतर लोक टाळया वाजवितात. अशा गोष्टींना उत्तर द्यावेच असे काही नसते. ते कोणत्या भावनेने बोलले हे मला माहीती नसल्याचे लंके यांनी सांगितले.

प्रत्येकाच्या घराघरात, मनामनात आपल्या पक्षाचे चिन्ह पोहचविण्यावर भर देण्यात येत आहे. ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली असल्याने निवडणूकीची दुसरी रणनिती काही नाही नसल्याचे लंके यांनी स्पष्ट केले.

हनुमान भक्तालाच गदा मिळणार !

हनुमान जयंतीचे औचित्य साधून चाहत्यांनी दोन गदा भेट दिल्याच्या पार्श्‍वभुमीवर बोलताना लंके म्हणाले, मी हनुमान भक्त आहे, हनुमान भक्तालाच गदा मिळणार. मला गदा मिळणार नाही मग कोणाला मिळणार ? ही सर्वसामान्य जनतेची गदा आहेे. हनुमानरायांची गदा पैलवानाला दिली जाते अशी पुष्टीही लंके यांनी यावेळी बोलताना दिली.

हनुमानाचे दर्शन घेऊन लंके नगरकडे मार्गस्थ..

मंगळवारी सकाळी नीलेश लंके यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटूंबियांसह सुवासिनींनी लंके यांचे औक्षण केल्यानंतर ते अर्ज दाखल करण्यासाठी नगरच्या दिशेने निघाले. नेहमीच्या सवयीप्रमाणे हंगे गावातील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर लंके हे नगरकडे मार्गस्थ झाले.

म्हणून साधेपणाने अर्ज दाखल..

सध्या उष्णता फार आहे. कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी उन्हामध्ये येण्याचा त्रास देणे हे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे साधेपणानेच अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे लंके म्हणाले.

हजारो कार्यकर्त्यांची हजेरी..

लंके यांनी आपण अंध, अपंग बांधव तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार असल्याचे जाहिर केले होते. तरीही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. लंके हे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर कार्यकर्ते लंके यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत होते.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी अंध, अपंग तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.