Take a fresh look at your lifestyle.

आता व्हॉटस्ॲपवर आलेल्या बिलावर क्लिक करून भरता येणार Property Tax, अशी आहे ऑनलाईन प्रोसेस..

मालमत्ताधारकांना व्हॉटस्ॲपवर मालमत्ताकराची बिले पाठविण्यात येणार आहेत. व्हॉटस्ॲपवर आलेल्या बिलांवर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी पे नाऊ (Pay now) नावाचे बटन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या बटनावर क्लिक केले की, थेट संबधित मालमत्ताधारकांचे खाते उघडून त्यांचा कर किती आहे हे दिसेल, त्यानंतर तेथील पे नाऊच्या बटनावर क्लिक करून मालमत्ता धारकांना आपल्या मालमत्ताकराचा भरणा करता येणार आहे.

जळगाव महापालिकेच्या प्र. आयुक्त पल्लवी भागवत यांच्या संकल्पनेतून असा अनोखा उपक्रम राबविणारी जळगाव महापालिका राज्यात पहिली ठरली आहे.

जळगाव महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या गुगल पे, फोन पे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवरून मालमत्ता कर भरता येत होता.

त्यानंतर महानगरपालिकेच्या महसुल विभागाने पुन्हा ही पध्दत सोपी करत क्यूआर स्कॅनरच्या माध्यमातून मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. प्रत्येक मालमत्ताधारकांच्या बिलांवर क्यूआर कोड दिला जात होता. त्याद्वारे मालमत्ताधारकांना आपल्या मालमत्तांचा कर भरणे सोपं झालं होतं या मध्ये आता पुन्हा नवीन सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे.

महापालिकेने नागरिकांना कर भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईट मध्ये नवीन फिचर ॲड केले आहे . या नवीन फिचर मुळे महापालिकेकडून नागरिकांना व्हॉटस्ॲपवर आलेल्या पीडीएफ बिलांवर एक पे नाऊ नावाचे बटन बिलाच्या खाली उजव्या कोपऱ्याला दिले जाणार आहे.

या बटनावर क्लिक केलं, संबंधित मालमत्ताधारकांचे नाव, मोबाईल नंबर, मालमत्ता क्रमांक, प्रभाग समिती, वार्ड नंबर आणि कराची रक्कम दिसणार आहे.

सदर रक्कमेच्या पुढे पुन्हा पे नाऊ (Pay now) नावाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करून मालमत्ताधारकांना आपल्या कराची रक्कम भरता येणार आहे . त्यासाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा मालमत्ताधारकांच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे..