Take a fresh look at your lifestyle.

पुणे-सातारा-सांगलीकरांसाठी महत्वाची बातमी । ‘या’ जमीनदारांच्या गावातून जाणार पुणे – बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्ग ; पहा, जिल्ह्यातील गावांची नावे…

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) भारतमाला प्रकल्पांतर्गत ग्रीनफिल्ड महामार्गासाठीच्या बांधकामाचा प्रस्ताव मंजूर केला असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग 48 (जुना NH 4) चा एक जलद पर्याय असणार आहे. आणि त्यामुळे वाहतूक आणि गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे. 120 किमी / तास या वेगाला सपोर्ट करणारा, नवीन पुणे बंगळुरू ग्रीनफिल्ड महामार्ग हा आठ लेनचा प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस – वे असणार आहे.

यामुळे पुणे ते बंगळुरू हे अंतर 95 किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे पुणे आणि बंगळुरू दरम्यानचा प्रवास सध्याच्या 11 ते 12 तासांच्या तुलनेत 7 ते 8 तासांपर्यंत कमी होणार आहे. विमानाची धावपट्टी (Airplane runway) असलेला हा राज्यातील पहिला राष्ट्रीय महामार्ग ठरणार आहे.

नव्या पुणे – बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्गाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पुणे येथील कार्यक्रमात केली होती. त्यानंतर सातारा येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी लवकरच या महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाईल असे आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पुणे बंगलोर एक्सप्रेस-वे हा आठ पदरी डांबरी ग्रीनफिल्ड महामार्ग वारवे बुद्रुक येथून सुरू होईल. महाराष्ट्रातील हा पुणे जिल्ह्यातून सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील दुष्काळी भागातून – सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण आणि खटाव आणि सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ मिरज तालुक्यातून जाईल. कर्नाटकात, पुणे बंगलोर द्रुतगती मार्ग बेलगावी, बागलकोट, गदग, कोप्पल, बल्लारी, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर या मार्गे जाईल आणि नंतर बंगळुरूला जोडला जाणार आहे.

सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबतची नोटीस नुकतीच जारी केली आहे. त्यानुसार खानापूर आणि मिरजेच्या उपविभागीय अधिकार्‍यांची या कामी भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड महामार्ग, समाविष्ट गावे :-

पुणे :- पुणे (हडपसर) वारवे बुद्रुक या गावातून सुरु होऊन – सासवड – बारामती या तीन तालुक्यातून जाऊन तो सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण आणि खटाव या तालुक्यातील गावांतून जाऊन तो पुढे सांगली जिल्ह्याला जोडला जाणार आहे.

याबाबत सांगली जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रियेला झाले सुरुवात, जाणून घ्या गावांची नावे…

खानापूर तालुक्यातील गावांची नावे : माहुली, वलखड, वेजेगाव भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द.

तासगाव तालुक्यातील गावांची नावे : कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, शिरगाव, हातनोली, बस्तवडे, सावळज, वज्रचौंडे, मणेराजुरी आणि गव्हाण.

कवठे महांकाळ तालुक्यातील गावांची नावे : बोरगाव, मळणगाव, हारोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी, रामपूरवाडी आणि कोगनोळी.

मिरज तालुक्यातील गावांची नावे : सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडी.

यानंतर तो कर्नाटकातील बेलगावी, बागलकोट, गदग, कोप्पल, बल्लारी, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर या मार्गे जाईल आणि नंतर बंगळुरूला जोडला जाईल.