Take a fresh look at your lifestyle.

जिल्ह्यातील 423 शेतकऱ्यांना हक्काचे शेततळे ! शेततळ्यासाठी ₹ 75,000 तर अस्तरीकरणासाठी ₹1.50 लाख अनुदान, पहा अर्ज प्रोसेस..

छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील 423 शेतकऱ्यांना हक्काचे शेततळे मिळाले आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 2 कोटी 66 लाख 40 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. सांगली जिल्हयातील तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.

‘मागेल त्याला शेततळे ‘ योजनेची घोषणा राज्य सरकारने मागील अर्थसंकल्पात केली. शेतकरी, कृषी क्षेत्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या योगदानाचे स्मरण म्हणून राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षपूर्तीनिमित्त या योजनेला शिवरायांचे नाव देण्यात आले.

2023 / 24 या आर्थिक वर्षांत ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग, ठिबक / तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी आणि कॉटन थ्रेडर देण्याबाबत मान्यता देण्यात आली..

या योजनेंतर्गत आता ‘मागेल त्याला शेततळे’ देण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे घेऊन पाण्याची गरज भागविता येणार आहे. ही शक्ती या संकल्पना वेगाने अंमलात आणली जात आहे.

योजनेच्या अटी..

‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये अर्जदार शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

बातमी : ठिबकसाठी हेक्टरी मिळवा 1,27,000 रु. अनुदान, पहा ऑनलाईन अर्ज प्रोसेस..

शेततळ्यासाठी 75 हजार रुपये अनुदान..

यापूर्वी ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी 50 हजारांचे अनुदान होते, मात्र आता यामध्ये वाढ करून शेततळे खोदकामासाठी 75 हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. जर शेतकऱ्यांनी अस्तरीकरणासह अर्ज केल्यास आकारमानानुसार जास्तीत जास्त 1 लाख 50 हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

शेततळ्यासाठी आवश्यक कागदपत्रे..

जमीनीचा 7/12 आणि 8-अ उतारा
आधारकार्ड
बँक पासबुक
हमीपत्र
जातीचा दाखला
पासपोर्ट फोटो

शेततळ्यासाठी अर्ज कसा कराल ?

अर्ज सादर करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा.

शेतकरी स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील..

योजनेचा लाभ घ्या जिल्हयात छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबवली जात आहे. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेच्या माहितीसाठी गावस्तरावर कृषी सहाय्यक व तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा..

विवेक कुंभार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी