भारताच्या पूर्व किनारपट्टीला ‘मोचा’ नामक चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा व तामिळनाडू या तीन राज्यांना लर्ट जारी करण्यात आला आहे. या राज्यांत गारपीट होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
या शिवाय महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तटीय राज्यातील मच्छीमारांनी पुढील 4 दिवस समुद्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बंगालच्या उपसागरात व चेन्नईलगतच्या समुद्रात ‘मोचा’चे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. सोमवार , 9 मे रोजी सर्वप्रथम कमी दाबाचा पट्टा तयार होईल व त्यानंतर ते वादळ बनत आणखी धोकादायक बनण्याची शक्यता आहे.
या दरम्यान, 40 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. चालू आठवड्यात पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तामिळनाडूला हे वादळ धडकणार आहे. परंतु, त्याचा परिणाम देशातील इतर राज्यांवर होणार असल्याचे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.
‘मोचा’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कोकण पट्ट्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मराठवाड्यातील धाराशिव या जिल्ह्यात येत्या 2 ते 3 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच जळगाव, धुळे, नाशिक शहरात सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळघार पावसाळा सुरुवात झाली असून चिपळूण, गुहागर, खेड, दापोली तालुक्याला पावसाने झोडपले आहे. आंबा सिझन चालू असताना पाऊस सुरु झाल्यामुळे आंबा शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहील आहे.
अमरावती जवळ नांदगाव खंडेश्वरमध्ये गारपीट व मुसळधार पावसाळा सुरुवात..
पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट
पुणे शहर व परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी वेगाने वारेही वाहत होते. सायंकाळी झालेल्या या पावसामुळे नागरिक, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. गेले काही दिवस शहरात अवकाळी पाऊस सक्रिय आहे. राज्याच्या काही भागावर कमी दाबाचा पट्टा कार्यरत असल्यामुळे आकाशात पावसाचे ढग तयार होत आहे. त्याचप्रमाणे आर्द्रताही वाढली आहे. त्याचा परिणाम हवामानावर होऊन पुणे शहरात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तसेच आजही पुणे शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या राज्यांतही पुढील 4 दिवस पावसाचे..
मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्वोत्तर उत्तर प्रदेशात पुढील 4 दिवसांत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ओडिशातील 18 जिल्ह्यांत मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अँलर्ट जारी केला. सर्वच आपत्कालीन विभागांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती जिल्ह्यांतही दक्ष राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या राज्यांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटांसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. याचवेळी उत्तर भारतातील पंजाब, हरयाणा आणि राजस्थानातही मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.