राज्यभरासह, जालना ते औरंगाबाद महामार्गावर रस्त्यांच्या कडेला ठिकठिकाणी सफरचंदासह गावरान मेवा म्हणून प्रसिद्ध असलेले सीताफळ विक्रीला येत असल्याचे दिसून येत आहे. जालना – औरंगाबाद जिल्ह्यात यंदा सीताफळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. या भागात गावरान सीताफळासह विकसित केलेल्या सीताफळाच्या बालानगरसह, गोल्डन सीताफळ इत्यादी जातींची सर्वाधिक लागवड झाली आहे.
पैठण तालुक्यातील काही भागात कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांना नेहमीच सतावत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत सतत नुकसान सहन करावे लागते. मात्र जिल्ह्य़ातील शेतकरी संजय कणसे यांनी जिद्द, योग्य नियोजन आणि मेहनतीने अर्ध्या एकरात सीताफळाची लागवड करून लाखोंचा नफा कमावला आहे. यावेळी त्यांच्या बागेतून सुमारे 11 टन सीताफळाची विक्री झाली आहे.
संजय कणसे हे धनगाव येथील एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. कणसे हे सुद्धा पूर्वी पारंपारिक पद्धतीने पीक उत्पादन घेत होते, मात्र यावेळेस त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला आणि 2016 मध्ये त्यांच्या अर्धा एकर शेतात सीताफळाची बाग लावली. यासोबतच काही भागात लिंबाची लागवड करण्यात आली आहे.
ज्यामध्ये कणसे यांनी सोळा बाय सोळा फुटांवर 600 रोपांची लागवड केली. या दरम्यान त्यांच्यावर दुष्काळासारखे संकटही आले. पण त्यातूनही मार्ग काढत त्यांनी कष्टाने व योग्य नियिजनाने बागेची देखभाल केली. आता त्यांची मेहनत रंगात येत आहे. आज त्यांना एका झाडापासून 35 ते 40 किलो फळे मिळत आहेत.
चांगला दर मिळत आहे..
कणसे तीन वर्षांपासून सीताफळाचे उत्पादन घेत आहेत, यावर्षी अर्धा एकर क्षेत्रात सीताफळातून सुमारे 20 टन उत्पादन मिळेल अशी त्यांना आशा आहे. पंधरा दिवसांपूर्वी संजय यांच्या सीताफळाची पहिली व दुसरी वर्गवारी करण्यात आली. यामध्ये त्यांना प्रतिकिलो 110 रुपये दर मिळाला असून वर्षाला एकूण 12 लाख रुपयांचा चांगला नफा मिळत आहे. आतापर्यंत सुमारे 11 टन सीताफळाची विक्री झाली असून आणखी 9 ते 10 टन सीताफळांचे उत्पादन होईल अशी कणसे यांना आशा आहे.
किती आला खर्च :-
काढणीच्या चौथ्या दिवशी कणसे यांच्या शेतातील सीताफळ विक्रीसाठी तयार आहे. एका फळाचे वजन तब्बल 500 ते 700 ग्रॅम इतके भारत आहे. सीताफळाच्या संपूर्ण लागवडीसाठी कणसे यांना 80 ते 90 हजार रुपये खर्च आला आहे.
या सीताफळ बागेचे वैशिष्ट्य म्हणजे मेलीबग रोगाशिवाय या पिकावर इतर किडींचा प्रादुर्भाव होत नाही. मात्र यंदा फुलांचा बाहर येण्याच्या काळात सुरुवातीलाच मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे फळधारणा करताना मोठ्या अडचणी आल्या. परंतु कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने कणसे यांनी सीताफळाच्या लागवडीत यश मिळवले आहे.