संभाजीनगर, बीड, धाराशिवसह ‘या’ 9 जिल्ह्यांसाठी 755 कोटींचा निधी वितरित ; अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा !
जून ते ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या परंतु अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपासाठी ठरविण्यात आलेल्या निकषानुसार अपात्र ठरलेल्या गावांना, मंडळांना आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा असा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, पावसामुळे नुकसान झालं होतं. त्यासाठी 8 सप्टेंबर 2022 रोजी एक शासन निर्णय घेऊन राज्यातील 30 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी 3 हजार 501 कोटी रुपये तसेच बीड, उस्मानाबाद, आणि लातूर या 3 जिल्ह्यांसाठी मिळून गोगलगाई च्या नुकसानीसाठी 98 कोटी रुपये, याचबरोबर 28 सप्टेंबर 2022 रोजी शासन निर्णय घेऊन राज्यातील दहा जिल्ह्यांकरता 353 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
परंतु, या नुकसानभरपाईची मदत जाहीर करत असताना 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस किंवा 33% पेक्षा जास्त नुकसान अशा प्रकारचे निकष लावून नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली होती. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी 13 हजार 600 बागायत क्षेत्रासाठी हेक्टरी 27 हजार रुपये फळबाग क्षेत्रासाठी हेक्टरी 36 हजार रुपये अशी मदत जाहीर करण्यात आली होती.
या मदतीचे वाटप करत असताना बीड जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आला नव्हता. तसेच धाराशिव, लातूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, नांदेड जिल्ह्यामध्ये काही मंडळे वगळण्यात आली होती. यासाठी महत्त्वाचा निकष होता तो म्हणजे 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद असणे.
परंतु, 65 मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस होऊन सुद्धा सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे उडीद, मूग, सोयाबीन, पिकांचे नुकसान झालं होतं. मात्र हे नुकसान या निकषांमध्ये बसत नसल्यामुळे जिल्हाधिकारी, तहसील, तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून शेती पिकांचे पंचनामे केले जात नसल्याने शेतकऱ्यांना आपण भरपाई पासून वंचित राहतो की काय ? अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती.
या सर्वांच्या पार्श्वभूमीवतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी झालेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्यातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 9 जिल्ह्यांतील साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावरील बाधित सुमारे 5 लाख शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून सुमारे 755 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पुढील आठवड्यापासून निधी वितरीत करण्यात येणार आहे.
36 लाख शेतकऱ्यांना दिलासा :-
आतापर्यंत सुमारे 3954 कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे. काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरू असून सुमारे 30 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. हे 30 लाख आणि गुरुवारी मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या 755 कोटींच्या निधीमुळे अंदाजे 36 लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली .
लाभार्थी जिल्हे आणि क्षेत्र :-
औरंगाबाद : 12 हजार 679 हेक्टर
जालना : 678 हेक्टर
परभणी : 2 हजार 545 हेक्टर
हिंगोली : 96677 हेक्टर
बीड : 48.80 हेक्टर
लातूर : 2 लाख 13,251 हेक्टर
धाराशिव : 1 लाख 12 हजार 610 हेक्टर
यवतमाळ : 36 हजार 711 हेक्टर
सोलापूर : 74 हजार 446 हेक्टर
एकूण क्षेत्र : 5 लाख 49 हजार 646.31 हेक्टर | एकूण मदत : 755 कोटी रुपये