Take a fresh look at your lifestyle.

1 ली ते 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाची नवी योजना । अपघात झाल्यास मिळणार 1 लाख 50 हजारांचं सानुग्रह अनुदान !

शेतीशिवार टीम, 23 जून 2022 : 1 ली ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून शासनाने सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला आहे. सुधारित योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 1 लाख 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

अपघातामुळे विद्यार्थ्यांना कायमचे अपंगत्व ( 2 अवयव / 2 डोळे किंवा 1 अवयव व 1 डोळा निकामी ) आल्यास एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान, अपघातामुळे कायमचे अपंगत्व (1 अवयव किंवा 1 डोळा कायम निकामी) आल्यास 75 हजार रुपयांचे अनुदान, विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये अनुदान

तसेच विद्यार्थ्याचा सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास 1 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान तसेच विद्यार्थी कोणत्याही कारणाने (क्रीडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेचा धक्का, वीज अंगावर पडून) जखमी झाल्यास प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.

विद्यार्थ्यांच्या सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक / गट शिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक यांची असणार आहे.

या योजनेमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणे, अहत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू, मोटार शर्यतीतील अपघात या बाबींचा समावेश राहणार नाही.