Take a fresh look at your lifestyle.

Ahmednagar: आता भाऊबंदकीचे वाद कायमचे मिटणार, जिल्हाभर ड्रोनद्वारे जमिनींची मोजणी सुरु, शेतजमिन, मालमत्तांचे मिळणार डिजिटल नकाशे..

महाराष्ट्रात महसूल व शेतीच्या वादावरील असंख्य तक्रारी व न्यायनिवाडे प्रलंबित आहेत. 20 ते 25 वर्ष या बाबतचे निकालही लागत नसून दिवसेंदिवस शेती संबंधीचे वाद वाढत आहेत.

यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने 2017 साली याबाबत एक योजना आराखडा तयार करून गावातील शेतकऱ्यांसमोर मांडला. स्मार्ट व्हिलेज प्रकल्प अंतर्गत गावातील शेत जमीन मोजणी करण्याची संकल्पना पुढे आणली गेली असून अहमदनगर जिल्ह्यातील जमिन, घरे यांसारख्या मालमत्तांची ड्रोनद्वारे मोजणी पूर्ण करण्याची मोहीम जोमात सुरु झाली आहे.

ड्रोन सर्व्हे, चौकशीचे काम, मालमत्तांची सनद अश्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या मालमत्तांचे डिजिटल नकाशे मिळणार आहेत.

ही जिल्ह्यातील सामान्य नागरिकांसाठी मोठी गोष्ट असणार आहे. जिल्ह्यातील मालमत्तांची ड्रोनद्वारे मोजणी करण्यासाठी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाला महाराष्ट्र शासनाकडून ड्रोन पुरविण्यात आले आहेत. ड्रोन उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यात प्रत्यक्ष मोजणीस सुरुवात झाली असून आता या मोहिमेने चांगला वेग पकडला आहे.

जिल्ह्यातील 1 हजार 620 गावांपैकी 1 हजार 401 गावांमध्ये ड्रोन सर्व्हे पूर्ण झाला असून आता चौकशीची कामे व सनद तयार करणे अशी कामे काही गावांमध्ये बाकी आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या मालमत्तांची सनद उपलब्ध होणार आहे.

काय आहे ड्रोनद्वारे मोजणीचे फायदे ?

प्रशासनाला मिळकतींचे नेमके क्षेत्र माहिती होईल.

मालकी हक्काची अभिलेख मिळकत पत्रिका तयार होईल. ज्यामुळे ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संरक्षण होईल.

मिळकत पत्रिका तयार झाल्याने घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल, ज्याचा सामान्य नागरिकांना लाभ घेता येईल.

शासन मालकीच्या मिळकतीचे संरक्षण तर होईलच सोबत मिळकतींचा नकाशा तयार होऊन सीमा देखील निश्चित होतील.

209 गावांमध्ये झाली आहे मालमत्तांची सनद तयार..

जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 401 गावांमध्ये ड्रोनद्वारे मालमत्तांची मोजणी पूर्ण झाली आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या चौकशीचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यात ड्रोन सर्व्हे झाल्यानंतर 280 गावांमध्ये चौकशीचे काम पूर्ण झाले आहे. इतर गावांमध्ये चौकशीचे काम प्रगतिपथावर असल्याचे जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

चौकशीचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील 209 गावांमध्ये मालमत्तांची सनद तयार करण्यात आली आहे. ही सनद नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध असेल, जेणेकरून नागरिक कुठेही ही सनद पाहू शकतील.

जिल्ह्यातील ड्रोन सर्व्हेचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. इतरही शिल्लक कामे पूर्ण करण्याचे नियोजन केले गेले आहे रहिवाशांना मिळकतीची सनद व नकाशे असे अभिलेख डिजिटल स्वरुपात मिळतील. त्यामुळे गावातील जागेसंबंधीचे वाद मिटतील असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदलकर म्हणाले.

काय आहे तालुकानिहाय सर्वेक्षणाची स्थिती :-

अकोले तालुक्यामध्ये 193 पैकी 82 गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
संगमनेर तालुक्यातील एकूण गावे 174, सर्वेक्षण पूर्ण झालेली गावे 173

कोपरगाव तालुक्यातील एकूण गावे 80, सर्वेक्षण पूर्ण झालेली गावे 79
राहता तालुक्यातील एकूण गावे 61, सर्वेक्षण पूर्ण झालेली गावे 56

श्रीरामपूर तालुक्यातील एकूण गावे 57, सर्वेक्षण पूर्ण झालेली गावे 51
नेवासा तालुक्यातील एकूण गावे 131, सर्वेक्षण पूर्ण झालेली गावे 130

शेवगाव तालुक्यात 115 गावांपैकी 103 गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
पाथर्डी तालुक्यात 137 गावांपैकी 133 गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

नगरमध्ये 124 गावांपैकी 103 गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
राहुरी तालुक्यात 96 गावांपैकी 92 गावांच्या सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

पारनेर तालुक्यात 131 गावांपैकी 100 गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
श्रीगोंदा तालुक्यात 116 गावांपैकी 102 गावांचे ड्रोन सर्वे पूर्ण झाले आहे.

कर्जत तालुक्यात 118 गावांपैकी 111 गावांचे सर्वे पूर्ण झाले आहे.
जामखेड तालुक्यात 87 गावांपैकी 86 गावांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.