Take a fresh look at your lifestyle.

देहू – आळंदी – पंढरपूर‎ पालखीमार्ग वर्षभरात पूर्ण होणार, तर दौंड – बारामतीमार्गे JNPT पर्यंत रेल्वेमार्ग उभारणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती..

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीमार्गाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल आणि पुढील वर्षीच्या प्रारंभी त्याचे उद्घाटन होऊन तो सुरू होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तर याच वेळी वाहतूककोंडीमुळे चर्चेत आलेल्या चांदणी चौकातील पुलाचे कामही प्रगतीपथावर असून, येत्या 1 मे रोजी त्याचे उद्घाटन करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पुण्यातील देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला जाणाऱ्या पालखीमार्गांची हवाई पाहणी केली. यामध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जाणारे काम त्यांनी तपासले. या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशीबोलले. यावेळी खा. रणजितसिंह नाईक – निंबाळकर उपस्थित होते.

कामाचा आढावा घेतल्यानंतर येत्या मे महिन्यापर्यंत या दोन्ही मार्गांचे मिळून सुमारे 60 ते 70 टक्के काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. वर्षअखेर हे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्रासाठी वारी आणि पर्यायाने पालखी हा खूप महत्त्वाचा, आस्थेचा विषय आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

देहू, आळंदी, पंढरपूर ही महत्त्वपूर्ण क्षेत्र आहेत. हा भक्तिमार्ग साधारण नसावा, इथे आम्ही विशेषत्व जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेले वृक्ष लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. या मार्गांवरील दुपदरी रस्ते चौपदरी करत आहोत आणि वारकऱ्यांचे पाय भाजू नयेत, याची काळजी घेणार आहोत, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

पुण्यातील चांदणी चौक एप्रिल अखेरपर्यंत होणार पूर्ण..

पुण्यातील चांदणी चौकातील मार्गाचे अपूर्ण काम येत्या एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण केले जाईल आणि १ मे रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या कामाचे उद्घाटन केले जाईल, अशी घोषणा मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

दौंड – बारामतीमार्गे JNPT पर्यंत रेल्वेमार्ग उभारणार..

दौंड – बारामतीमार्गे नवी मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (JNPT) नवीन रेल्वेमार्ग उभारण्याचा प्रस्ताव आपण रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

राज्यातील महामार्गाच्या कामासाठी लागणारे सिमेंट आणि पोलाद यावरील वस्तू सेवा कर राज्य शासनाने माफ करावा, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. पुणे शहरासह जिल्ह्यात रस्ते विकासाची सुमारे 53 हजार कोटी रुपयांची कामे सुरू असून त्यात पुणे – नगर , पुणे – नाशिक , पुणे – सोलापूर आणि शहरातील वर्तुळाकार मार्गाचा समावेश असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

व्हेअर इज नवले पूल..?

पुण्यातील बहुचर्चित आणि सातत्याने अपघातांचा स्पॉट ठरलेल्या नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत , असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मंत्री गडकरी यांनी नवले पूल कुठे आहे आणि त्याचा आमच्या विभागाशी काय संबंध ? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी नवले पूल आपल्याच विभागाकडे असल्याचे नमूद केले. यावर गडकरी यांनी उपाययोजना करू, असे उत्तर दिले.

देहू – आळंदीचा पहिला प्रवास पीएमटीने..

देहू व आळंदी हे आपल्या सगळ्यांसाठी आस्थेचे व श्रद्धेचे केंद्र आहे. मी आतापर्यंत अनेक रस्ते बांधले, पण या रस्त्याविषयी वेगळे स्थान माझ्या मनात आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा पुण्यात आलो होतो, तेव्हा पीएमटीच्या बसने देहू व आळंदीला गेलो होतो. त्यासाठी स्वारगेटवरून बस पकडली होती, अशी आठवण नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितली.