Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांना आधार देणारी योजना, अपघात झाल्यास आता फक्त 30 दिवसांत मिळणार 2 लाख रुपये अर्थसहाय्य, पहा कागदपत्रे अन् अर्ज प्रोसेस..

शेती व्यवसाय करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते, वाहन अपघात आदी कारणांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबियास आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यापूर्वी राबविण्यात येत असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचे विमा दावे वेळेत मंजूर न करणे, अनावश्यक त्रुटी काढून विमा प्रकरणे नाकारण्याचे प्रकार विमा कंपन्यांकडून होत असल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे.

घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करून संकटातून बाहेर काढत त्यांना मानसिक बळ देणारी योजना म्हणून ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ ओळखली जाणार आहे .

अनुदानास पात्र बाबी :-

राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई – वडील, शेतकऱ्याची पत्नी / पती, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, जंतूनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून झालेला मृत्यू , खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलाईटकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावण्यामुळे जखमी अथवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात या अपघाताचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

आवश्यक कागदपत्रे :-

विहीत नमुन्यातील अर्ज
सातबारा उतारा
मृत्यूचा दाखला
शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्याकडील गांव नमुना क्र. 6 नुसार वारसाची नोंद
शेतकऱ्याच्या वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधारकार्ड
निवडणूक ओळखपत्र अथवा ओळख किंवा वयाची खात्री होईल असे कोणतीही कागदपत्रे
प्रथम माहिती अहवाल
स्थळ पंचनामा
पोलीस पाटील यांचा माहिती अहवाल तसेच अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा.

प्रस्तावासोबत कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील. संबंधित अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्यांच्या वारसदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अपघाताचे प्रकरण निदर्शनास आल्यापासून 30 दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक राहील. प्रस्तावासाठी कृषी विभागाचे संबंधित गावातील कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक आदी क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी मार्गदर्शन करतील.

योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान :-

अपघाती मृत्यू अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास अशावेळी 2 लाख रुपये आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना क्लेम फॉर्म (PDF) :- इथे क्लिक करा