Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी । ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार 7.50 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज ; पहा पात्रता, ऑनलाईन अर्ज प्रोसेस..

शेतीशिवार टीम : 23 जुलै 2022 :- नवे शैक्षणिक वर्ष 2022-23 आता सुरु होत असून राज्यातील राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यात येणार आहे.

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत हे कर्ज दिले जाणार असून ते 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत असणार आहे. अल्पसंख्याक समाजातील दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.

आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनीयरिंग, मेडिकल, नर्सिंग, फॅशन डिझायनिंग, टुरिझम, पत्रकारिता, मास मीडिया, चित्रपट निर्मितीशी संबंधित विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, ॲनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे. त्यासाठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत.

असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांनी केले आहे. यासाठी malms.maharashtra.gov.in या लिंकवर अर्ज करावा लागणार असून मुंबई येथील कार्यालयातूनही अधिक माहिती घेता येणार आहे.

व्याजदर 3% ; शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परतफेड :- 

केंद्र शासनाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळू शकते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय 16 ते 32 वर्ष असावे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी भागासाठी 1 लाख 20 हजार रुपयांपेक्षा कमी, तर ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपयांपेक्षा कमी असावी.

राज्य शासनामार्फत मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना राबवण्यात येत असून यामधून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय 18 ते 32 वर्ष असावे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत असावी, अशा अटी आहेत.

दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनांसाठी व्याजदर फक्त 3% इतका आहे. विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यांपासून पुढील 5 वर्षांत कर्जाची परतफेड करायची आहे, असे डॉ. लालमिया शेख यांनी सांगितले.