Take a fresh look at your lifestyle.

MHADA Konkan। ठाणे, घणसोली, वसई-विरारमध्ये 14 लाखांत घर, 4 दिवसांत 5325 जणांची नोंदणी; असा करा ऑनलाईन अर्ज..

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण मंडळातर्फे 10 मे रोजी 4,640 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या या घरांच्या लॉटरीत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत 5,325 हून अधिक लोकांनी अनिवार्य नोंदणी केली आहे. त्याच वेळी, गेल्या 3 दिवसांत नोंदणी केलेल्यांपैकी 2,449 हून अधिक अर्जदारांनी अनामत रक्कम जमा करून सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे.

लॉटरीसाठी सक्तीची नोंदणी करण्याची प्रक्रिया 8 मार्चपासून सुरू झाली आहे. 10 एप्रिल रोजी रात्री 11:59 पर्यंत अर्जदारांसाठी नोंदणी लिंक खुली असणार आहे. अर्जदार 12 एप्रिल रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत RTGS किंवा NEFT द्वारे पैसे जमा करून त्यांच्या दाव्याची पुष्टी करू शकतात. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील घरांचा लॉटरीत समावेश करण्यात आला आहे. यासोबतच 14 भूखंडांचाही लॉटरीत समावेश करण्यात आला आहे.

अँप नोंदणी..

म्हाडाच्या लॉटरीत सामील होण्यासाठी अर्जदार म्हाडाच्या वेबसाइट तसेच मोबाइल अँपद्वारे नोंदणी करू शकतात. कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारुती मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, IHLMS 2.0 (इंटिग्रेटेड हाऊसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम) हे अँप नागरिकांची सोय लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. लोक म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर तसेच मोबाइल अँपद्वारे नोंदणी करू शकतात. हे अँप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

पात्र अर्जदारांची यादी होणार 4 मेला प्रसिद्ध..

यावेळी म्हाडाकडून सोडत प्रक्रिया 100 टक्के ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. अर्जदारांच्या सर्व कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने छाननी केली जाणार आहे. म्हाडाच्या म्हणण्यानुसार, नोंदणीचा ​​कालावधी संपल्यानंतर सर्व अर्जदारांच्या कागदपत्रांचीही ऑनलाइन पडताळणी केली जाणार आहे. पात्र अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in वेबसाइटवर 4 मे रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

ठिकाण, घरांची संख्या आणि उत्पन्न गटानुसार किंमती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या कागदपत्रांसह केली जात आहे नोंदणी..

लॉटरी प्रक्रियेला हायटेक करण्यासोबतच म्हाडाने अनिवार्य कागदपत्रांची संख्याही कमी केली आहे. लॉटरीत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत अर्जदारांना 21 कागदपत्रे सादर करावी लागत होती. लॉटरी सॉफ्टवेअर अपडेट करून म्हाडाने आवश्यक कागदपत्रांची संख्या 7 वर आणली आहे. लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्जदारांना ही 7 कागदपत्रे तयार ठेवावी लागतील.

यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्र, जातीचा दाखला आणि आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्या – त्या वर्गाचे प्रमाणपत्र दस्तऐवज यांचा समावेश आहे.

नोंदणीसाठी 10 एप्रिलपर्यंत मुदत..

– 12 एप्रिलपर्यंत जमा करू शकता पैसे

– 4 मे रोजी पात्रता यादी होणार प्रसिद्ध

– 10 मे रोजी निघणार लॉटरी