MHADA Konkan : 1 घरासाठी 4 दावेदार, 4640 घरांसाठी 18905 जणांकडून नोंदणी, पहा अंतिम मुदत अन् कधी लागणार लॉटरी ?
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ठाणे, कल्याण, पालघर, रायगड आणि रत्नागिरीतील घरांना लोकांना पसंती मिळत आहे. लॉटरीत समाविष्ट घरांपेक्षा म्हाडाकडे चौपट जास्त अर्ज आले आहेत, यावरून लोकांच्या पसंतीचा अंदाज लावला जाऊ शकतो, तर लॉटरीत सहभागी होण्यासाठी अनिवार्य ऑनलाइन नोंदणीची मुदतवाढ 19 एप्रिल 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी दिली असून 21 एप्रिल, 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन व आरटीजीएस / एनइएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.
आतापर्यंत 18905 लोकांनी 4640 घरांसाठी नोंदणी केली आहे. तर 10,430 अर्जदारांनी अनामत रक्कम जमा करून सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. अर्जदारांनी एजंटांपासून सावध राहण्याचे आवाहन म्हाडाने केले आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, लॉटरीसाठी म्हाडाकडून कोणत्याही एजंटची नियुक्ती करण्यात आलेली नाही. लॉटरीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली जात आहे.
अर्जदारांना म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवरून लॉटरीत समाविष्ट घरांची माहिती मिळू शकते. तसेच, अर्जदार IHLMS 2.0 (इंटिग्रेटेड हाउसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टम) अँपद्वारे लॉटरी नोंदणी आणि पैसे जमा करण्याची प्रक्रिया देखील पार पाडू शकतात. वेबसाइटवर लोकांना मदत करण्यासाठी व्हिडिओही अपलोड करण्यात आले आहेत.
पात्रता यादी..
म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी 10 मे रोजी ठाण्यात निघणार आहे. 4640 घरांच्या नावाच्या शर्यतीत सहभागी होण्यासाठी, अर्जदार 19 एप्रिल रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जदार 12 एप्रिल रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत RTGS किंवा NEFT द्वारे पैसे जमा करून त्यांच्या दाव्याची पुष्टी करू शकतात.
म्हाडाच्या म्हणण्यानुसार, 19 एप्रिलच्या रात्रीपासून ऑनलाइन नोंदणीची लिंक बंद होणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्जदारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण केली जाईल. 4 मे रोजी म्हाडाकडून पात्र आणि अपात्रांची यादी ऑनलाइन जाहीर केली जाणार आहे.
लॉटरीत समाविष्ट एकूण घरे – 4,640
आतापर्यंत केलेले अर्ज – 18,905
नोंदणी – 19 एप्रिल पर्यंत
पैसे जमा करा – 21 एप्रिल रात्री 11.59 वाजेपर्यंत
पात्रता यादी – 4 मे
लॉटरी – 10 मे
अर्ज भरतांना अर्जदारांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी 022 – 69468100 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.