Take a fresh look at your lifestyle.

MHADA Lottery Pune 2023 : 5863 घरांच्या सोडतीच्या निकालाची तारीख ठरली! ‘या’ दिवशी पार पडणार निकालाचा मुहूर्त..

महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाची सप्टेंबर महिन्यात साडेपाच हजार सदनिकांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीच्या निकालाचा मुहूर्त सापडला आहे. पालकमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तसेच म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत येत्या मंगळवारी (दि.5 डिसेंबर) पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सकाळी 9.00 वाजता संगणकीय पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे.

या ना त्या कारणास्तव सोडतीला उशीर झाल्याने आता अर्जदारांची प्रतीक्षा संपणार आहे. पुणे म्हाडा मंडळांतर्गत 5 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात 69 सदनिका, सांगली जिल्ह्यात 32 सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यात 337 सदनिकांचा समावेश करत यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2584 सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजने अंतर्गत 2445 सदनिका अशा विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत 5863 सदनिकांचा समावेश आहे.

म्हाडाकडून अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. परंतु, ऑनलाइन प्रक्रियेसाठी नव्याने तयार केलेल्या प्रणालीतील तांत्रिक त्रुटींचा अर्जदारांना अर्ज भरताना फटका बसल्याने म्हाडाच्या अर्जावर परिणाम झाला. परिणामी, कमी अर्ज संख्या आल्याने म्हाडाला दोनदा मुदतवाढ देण्याची वेळ आली.

अखेर जवळपास 60 हजार अर्ज प्राप्त झाल्यानंतर संगणकीय प्रणलीद्वारे अर्ज प्रमाणीकरण, छाननी आणि इतर प्रक्रिय पाडल्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले होते.

मात्र सोडतीसाठी पालकमंत्री पवार आणि इतर मान्यवरांना वेळ मिळत नसल्याने निकाल पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे अगोदरच प्रतीक्षेत असणाऱ्या अर्जदारांच्या आनंदावर विरजन पडले होते. अखेर मान्यवरांना वेळ मिळाला असून 5 डिसेंबर रोजी सोडत जाहीर करण्यात येणार असल्याचे पुणे म्हाडा मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.