Take a fresh look at your lifestyle.

Mumbai MHADA Lottery Draw 2023 : मुंबईतील 4082 घरांच्या सोडतीबाबत मोठं अपडेट, गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंनी सांगितली तारीख..

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांच्या सोडतीची अर्ज स्वीकृती मुदत संपून तब्बल 1 महिना उलटल्यानंतर सोडत काढण्यासाठी 14 ऑगस्टचा मुहूर्त निघाला आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी वांद्रे येथील म्हाडा भवनात दिलेल्या भेटीदरम्यान पार पडलेल्या पत्रकार परिषदेत 14 ऑगस्ट रोजी 4 हजार 85 घरांची सोडत काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या वेळेनुसारच 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सोडत काढण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले आहे. यावेळेस विभागाच्या सचिव वल्सा नाय, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरिकर व अन्य अधिकारी यावेळेस उपस्थित होते.

म्हाडाच्या मुंबईतील गृहनिर्मितीत वाढ करण्यासाठी भूसंपादनापेक्षा पुनर्विकास प्रक्रियेला चालना कशी मिळेल याकडे लक्ष देणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी स्पष्ट केले. (Mumbai MHADA Lottery Draw 2023)

म्हाडाच्या वसाहतीतील इमारती जर्जरावस्थेत असून त्यांचा पुनर्विकास अत्यावश्यक आहे आणि अशा पुनर्विकासातूनही घरांचा साठा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सावे यांनी यावेळी सांगितले. तर गिरणी कामगारांची घरे, बीडीडी चाळींचा पुनर्विकास या प्रलंबित प्रकल्पांसाठी राज्य शासन सकारात्मक असून प्रकल्प मार्गी लावणार असल्याचेही सावे यांनी यावेळी स्पष्ट केले.

म्हाडाकडून 4082 घरांच्या सोडतीसाठी मे महिन्यात अर्ज विक्री व स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. तब्बल 2 महिने सुरू राहिलेल्या या अर्ज विक्री व स्वीकृती प्रक्रियेला 1 लाख 22 हजार अर्जदारांनी प्रतिसाद दिला होता. या अर्जदारांनी भरलेल्या अनामत रकमेतूनच म्हाडाकडे 519 कोटी रुपयांची अनामत रक्कम जमा झाली होती.

त्यामुळे 500 कोटीहून अधिक रक्कम बँक खात्यात असताना म्हाडा सोडतीचा मुहूर्त लांबवत असल्याचे दिसून आले होते. सर्वसामान्यांनी तब्बल तीन महिने प्रतीक्षा केल्यानंतर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी 14 ऑगस्ट रोजी घरांची सोडत काढण्याच जाहीर केले आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीची तारीख जाहीर करून खऱ्या अर्थाने मुंबईतील घरासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला दिलासा दिला आहे.

फ्लॅटच्या कोणत्या श्रेणीसाठी किती अर्ज ?

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीत समाविष्ट असलेल्या 4082 सदनिकांपैकी 1947 सदनिका प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत येतात. म्हाडाने हे फ्लॅट प्रामुख्याने पहाडी गोरेगावमध्ये बांधले आहेत. म्हाडाच्या अंतिम यादीनुसार, PMAY-U साठी 22,472 अर्ज प्राप्त झाले आहेत, ज्यांचा समावेश सोडतीमध्ये केला जाईल. किमान 28,862 लोकांनी 843 EWS (आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग) फ्लॅटसाठी अर्ज केले आहेत, तर बहुतांश अर्जदारांनी कन्नमवार नगर विक्रोळीला पसंती दिली आहे.

LIG (कमी उत्पन्न गट) श्रेणीमध्ये 1,034 सदनिकांचा समावेश आहे ज्यासाठी म्हाडाला 60,522 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक फ्लॅट आणि अर्ज पहाडी गोरेगावसाठी आहेत. तर, एमआयजी श्रेणी अर्थात मध्यम उत्पन्न गटासाठी केवळ 138 सदनिका आहेत, ज्यासाठी 8,395 अर्जदार आहेत.

या अर्जदारांची पहिली पसंती उन्नत नगर गोरेगाव आहे. म्हाडाच्या लॉटरीत HIG श्रेणीतील एकूण 120 सदनिका आहेत, ज्यासाठी एकूण 2,068 अर्ज सोडतीचा भाग असतील. शिंपोली कांदिवली येथे बांधलेल्या म्हाडाच्या फ्लॅटसाठी HIG श्रेणीचे सर्वाधिक अर्ज आले आहेत.