Take a fresh look at your lifestyle.

नगरकरांची तब्बल 17 वर्षांची प्रतीक्षा संपली! धरण जलाशयावरील राज्यातील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी खुला, 60Km चा प्रवास वाचणार..

तब्बल 17 वर्षे रखडलेला धरण जलाशयावरील राज्यातील सर्वात मोठा पूल असलेला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू काल जनतेसाठी खुला करण्यात आला. या पुलामुळे निळवंडे धरणामुळे संपर्क तुटलेल्या पिंपरकणे परिसरातील सतरा गावांची वाहतूक सुरळीत होणार असून तब्बल 60 किमीचा प्रवास वाचणार आहे. या पुलामुळे आदिवासी डोंगराळ भागातील 25 गावांचा फायदा होणार असून या आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे जलसेतुचा लोकार्पण सोहळा आ.डॉ.किरण लहामटे यांचे हस्ते झाला.

सर्वसामान्यांचा प्रवास होणार सुखकर..

अकोले तालुक्यात आदिवासी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, या आदिवासी समाजातील अनेक गावांची मुख्य बाजारपेठ ही राजुर आहे. या आदिवासी शेतकऱ्यांना राजूर गाठण्यासाठी पिंपरकणे पुल हा अनेक वर्षापासुन रखडलेल्या अवस्थेत असल्याने आजपर्यंत रंधा मार्गे यावे लागतं होते. तसेच या मार्गे रस्ता खराब असल्याने मोठ्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागत होता. याच कारणाने हा पुल महत्वाचा आहे. हा पूल 2006 साली मंजूर झाला होता,  तब्बल 17 वर्षांची प्रतीक्षा संपल्याने आता सर्वसामान्यांसाठी खुला झाल्याने आहे.

या पिंपरकणे पुलाच्या अध्यक्षस्थानी पिंपरकणे सरपंच अनुसया थिगळे होत्या. जेष्ठ नेते कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, सेवादलाचे साथी विनय सावंत राजुरच्यासरपंच पुष्पाताई निगळे, मार्केट कमेटीचे सभापती भानुदास तिकांडे, शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख डॉ. मनोज मोरे, महेशराव नवले, पर्वतराव नाईकवाडी, डॉ. संदिप कडलक, नगरसेवक आरीफ शेख, प्रकाश नाईकवाडी आदी उपस्थित होते.

आ.लहामटे म्हणाले, या जलसेतुचे काम अनेक वर्षापासून सुरु असल्याने या भागातील नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागला. मला आमदार केल्यानंतर आपण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अर्थमंत्री ना. अजित पवार असताना यांनी भरीव निधी दिला. आज या राघोजी भांगरे जलसेतुचे लोकार्पण होऊन इतिहास रचण्याचे कामाचे भाग्य मला लाभले.

या सरकारमध्ये मी ना. अजित पवार यांचे बरोबर गेलो कारण तालुक्यात विकासासाठी निधी आणायचा असेल तर सत्तेबरोबर अर्थात दादाबरोबर जाणे गरजेचे होते. जेष्ठ नेते सीताराम गायकर म्हणाले, तालुक्यात कामाचा माणूस म्हणून ओळख आमदारांची आहे. देशाचे नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी कायम अकोले तालुक्यावर प्रेम केले आहे. त्यांनी कायम भरीव निधी दिल्याने तालुक्यातील विकासकामे मार्गी लागले.