Take a fresh look at your lifestyle.

पुण्यातील आणखी एका बँकेला RBI चा मोठा धक्का; परवाना रद्द करत आजच्या -आज बँक बंद करण्याचे दिले आदेश !

शेतीशिवार टीम : 11 ऑक्टोबर 2022 :- भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने राज्यातील आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. या बँकेत पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्यामुळे RBI ने पुण्यातील ‘सेवा विकास सहकारी बँके’चा (Seva Vikas Co-operative Bank) परवाना रद्द केला. रिझर्व्ह बँकेने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, बँकिंग परवाना रद्द केल्यामुळे, सेवा विकास सहकारी बँकने 11 ऑक्टोबरपासून आपले कामकाज बंद करावे असे आदेश दिले आहे. बँक बंद झाल्यानंतर आता खातेदारांच्या ठेवींच्या पैशाचे काय होणार ? हा मोठा शेतकऱ्यांसह खातेधारकांना पडला आहे.

कामकाज बंद करण्याचे आदेश :-

रिझर्व्ह बँकेच्या 10 ऑक्टोबर 2022 च्या निवेदनानुसार, सेवा विकास सहकारी बँक लि. पुणे (Seva Vikas Sahakari Bank Ltd. Pune) यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांना बँक बंद करण्यासाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याचे आदेश जारी करण्याची विनंती करण्यात आली आहे.

ठेवीदारांचे पैसेही रिटर्न्स करू शकत नाही !

निवेदनानुसार, रिझर्व्ह बँकेने सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे, कारण त्यांच्याकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही. RBI च्या म्हणण्यानुसार, सेवा विकास सहकारी बँकेचे कामकाज चालू ठेवणे ठेवीदारांच्या हिताचे नाही. बँकेची आर्थिक स्थिती डगमगली असून बँक सध्या त्यांच्या ठेवीदारांचे भांडवलही परत करू शकत आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ग्राहकांना पैसे कोण देणार ?

ज्या ग्राहकांचे पैसे सेवा विकास सहकारी बँकेत जमा आहेत त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षणाचा लाभ मिळेल. हा विमा विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून प्राप्त होत आहे. DICGC ही देखील रिझर्व्ह बँकेची उपकंपनी आहे. हे सहकारी बँकेच्या ग्राहकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते.

आता पर्यंत ज्या ग्राहकांनी 5 लाख रुपयांपर्यंतचा निधी या सहकारी बँकेत जमा केला आहे त्यांना DICGC कडून पूर्ण क्लेम मिळेल. ज्या ग्राहकांच्या ठेवी 5 लाखांपेक्षा जास्त आहेत, त्यांना पूर्ण रक्कम मिळणार नाही. DICGC कडून फक्त 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम भरपाई म्हणून देण्यात येते.

पुण्यातील या बॅंकेचंही लायसन्स झालंय रद्द :-

मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे, रिझर्व्ह बँकेने नुकतेच रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणे (Rupee Co-operative Bank Ltd) यांचा परवानाही रद्द केला होता. रुपी सहकारी बँकेची सेवा 22 सप्टेंबरपासून बंद करण्यात आली होती.