Take a fresh look at your lifestyle.

महापालिका कर्मचारी, आशासेविका, शिक्षकांना दिवाळीचं मोठं गिफ्ट! खात्यात 30 हजारांचे सानुग्रह अनुदान होणार जमा..

दिवाळी सण 10 नोव्हेंबरपासून सुरू होत असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कर्मचाऱ्यांना नऊ दिवस आधीच सानुग्रह अनुदानाची भेट दिली आहे. पालिका आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना 30 हजार तसेच करार तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचाऱ्यांना 24 हजार व आशा सेविका यांना 14 हजार रुपयांच सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत ठोक मानधन, किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीच्या वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे, रोजंदारीतील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक आणि मदतनीस व शासनाकडून मानधन प्राप्त होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही करार पद्धतीवरील कर्मचाऱ्यांप्रमाणे 24 हजार इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाण आरोग्य विभागातील आशा सेविका यांना 14 हजारांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

4559 अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाभ.. 

पालिकेतील 4559 अधिकारी कर्मचाऱ्यांना सानुग्रहाचा लाभ मिळणार आहे. दिवाळीपूर्वीच ही रक्कम अधिकारी, कर्मचारी यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. दिवाळीच्या अनुषंगाने मागील वर्षीपेक्षा वाढीव सानुग्रह अनुदान वितरण करण्याचा पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतलेल्या निर्णयाचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

शिक्षकांना मिळणार बोनस..

महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने वा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी कर्मचारी यांना 30 हजार सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.