Take a fresh look at your lifestyle.

मुंबईहून ठाणे गाठा फक्त 8 मिनिटांत..! देशातला पहिला Under Sea बोगदा, 21 Km अंतरासाठी तब्बल 6400 कोटींचा खर्च, पहा रूट मॅप..

भारतातील पहिल्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम आता लवकरच जमिनीवर दिसणार असून समुद्राखालील बोगद्याच्या सिव्हिल कामांना लवकरच ठाण्यात सुरुवात होणार आहे. मुंबई – अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर अंतर्गत 21 किमी. लांब बोगदा बनवण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने आर्थिक बोली उघडली आहे.

20.37 किमीचा लांबीचा बोगदा बांधण्यात येणार..

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान हायस्पीड ट्रेन म्हणजेच बुलेट ट्रेन धावणार आहे. बुलेट ट्रेन दोन्ही राज्यांमधील बहुतांश मार्गांवर उन्नत मार्गांवर धावणार आहे, परंतु मुंबईतील बीकेसी ते शिळफाटा दरम्यान तिला बोगद्यातून जावे लागेल हा बोगदा ठाणे खाडीवर असून सिंगल ट्यूबचा असेल आणि त्याला दुहेरी ट्रॅक असणार आहे. NHSRCL नुसार एकूण 20.37 कि.मी. बोगदा बांधावा लागणार आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यास फक्त 8 मिनिटात मुंबईहून ठाणे गाठता येणार आहे.

जमिनीपासून 24 मीटर खाली धावणार बुलेट ट्रेन..

बीकेसी स्टेशनची एकूण उंची 60 मीटर असेल, परंतु बुलेट ट्रेन जमिनीच्या पातळीपासून 24 मीटर खाली धावेल. स्टेशनच्या प्रवेशद्वारावर अरबी समुद्राचे चित्रण करणारी एक खास थीम असेल, ज्यामध्ये ढग आणि समुद्राच्या लाटांच्या प्रतिमा असतील. यात प्लॅटफॉर्म, स्टेशन परिसर आणि सेवा मजले असे तीन मजले असतील. स्थानकाला जोडण्यासाठी दोन प्रवेश-एक्झिट गेट असतील. प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुरक्षा, तिकीट, प्रतीक्षा क्षेत्र, बिझनेस क्लास लाउंज, विश्रांती कक्ष, स्मोकिंग रूम आणि माहिती काउंटर यांचा समावेश असणार आहे.

समुद्राखाली 7 किमी लांबीचा बोगदा..

यामध्ये समुद्राखाली सुमारे 7 कि.मी. लांब बोगदा देखील समाविष्ट आहे. यापैकी 15.42 कि.मी. च्या अंतरापर्यंत तीन टनेल बोअरिंग मशिनच्या साह्याने खोदकाम करण्यात येणार आहे, तर 4.96 किमी अंतरापर्यंत न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करून बोगदा बांधला जाणार आहे.

या कामासाठी तीन ठिकाणी शाफ्ट तयार करण्यात येणार आहेत. बुलेट ट्रेनचा बोगदा जमिनीपासून 24 मीटर खाली तयार होईल. हा बोगदा ठाणे खाडीखालून जाणार आहे. त्याचे सर्वेक्षण पूर्ण झालं आहे.

BKC मध्ये बांधले जाणार मुंबई HSR स्टेशन..

NHSRCL नुसार, BKC स्टेशन मुंबई HSR म्हणून ओळखलं जाईल. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी (HCC) आणि M/s MEIL संयुक्तपणे स्टेशन बांधणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला खुल्या आर्थिक निविदेत, मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (जॉइंट व्हेंचर) यांनी 3,681 कोटी रुपयांची सर्वात कमी बोली सादर केली होती. हे स्टेशन पूर्णपणे तयार होण्यासाठी 54 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

काय आहे ‘ग्राउंड रिअँलिटी’

या प्रकल्पासाठी NHSRCL ने यापूर्वीच 98.87% जमीन संपादित केली आहे. त्यापैकी गुजरातमध्ये 98.91%, दादरा नगर हवेलीमध्ये 100% आणि महाराष्ट्रात 98.76% जमीन संपादित करण्यात आली आहे.

मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आत्तापर्यंत किती झालंय काम ?

महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी आतापर्यंत 13.72% काम झाले आहे. तर गुजरातमध्ये 32.93% काम पूर्ण झाले आहे. मुंबईत समुद्राखाली 13.1 मीटर व्यासाचा बोगदा असेल, ज्यामध्ये दोन ट्रॅक असतील. जमिनीखाली 25 ते 40 मीटर खोल बोगदा करण्यात येणार आहे. मुंबई HSR कडून मेट्रो लाईन 2B ला कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे.

मुंबई आणि अहमदाबादला 12 स्टेशनद्वारे जोडले जाणार..

मुंबई बीकेसी, ठाणे शिळफाटा, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद / नडियाद, अहमदाबाद आणि साबरमती..