Take a fresh look at your lifestyle.

महसूल खात्यासह आता विधान परिषद सभापती पदही अहमदनगर जिल्ह्याला ? ‘या’ नेत्याचे नाव आघाडीवर…

शेतीशिवार टीम : 16 ऑगस्ट 2022 :- एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरी करत शिवसेनेला मोठा धक्का दिला. या बंडामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजकीय सत्तासंघर्ष सुरू झाला आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार पडले. शिवसेना बंडखोर गट – देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार आले. यापूर्वी राज्यसभा आणि त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिल्यानंतर आता भाजपचे पुढील लक्ष्य विधान परिषदेच्या अध्यक्षपदावर असल्याचं बोललं जात आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद भूषवत असले तरी सभापतीपदासह मंत्रिमंडळात गृह, अर्थ, महसूल, गृहनिर्माण, ऊर्जा ई. महत्त्वाची खाती ठेवून भाजपने सरकारमधील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्याची रणनीती भाजप नेतृत्व करत असल्याची चर्चा आहे.

विधानसभेपाठोपाठ विधानपरिषदेवरही वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपने आपल्या पक्षाचा नेता बसविण्याची कसरत सुरू केली आहे. सभागृहाच्या कामकाजावर आपली पकड घट्ट करण्यासाठी भाजप सभापतीपद मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. आता विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. आता विधानपरिषदेचे सभापतीपदही आपल्याकडेच असावे, असा भाजपचा आग्रह आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी भाजपकडून प्राध्यापक राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी दिली होती परंतु राज्यपाल महोदयांनी यादीकडं कधी ढुंकूनही पाहिलं नाही परंतु आता बंडखोर शिवसेना -भाजप सरकार आल्याने राज्यपालांच्या कोट्यातून 12 आमदारांची नियुक्ती करून संख्याबळ वाढवून आपलाच विधान परिषद सभापती बसवण्याचा भाजपचा प्लॅन आहे.

तसं पाहिलं तर राम शिंदे यांचेही नाव भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होते. मात्र पक्षनेतृत्वाने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची घोषणा केली. अशास्थितीत आता भाजपकडून राम शिंदे यांना अध्यक्षपदासाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेतील सदस्यांची संख्या पाहता कोणाचीही स्पष्ट संख्या नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक सदस्य आहेत, तर त्यांचा मित्रपक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे विधान परिषद सदस्य नाहीत. विधानपरिषदेतील सध्याचे संख्याबळ पुढीलप्रमाणे :-

भारतीय जनता पार्टी 24
शिवसेना – 11
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी – 10
कांग्रेस – 10
अन्य – 7
रिक्त – 16

राज्यपालपाल नियुक्त 12 आमदाराची संख्या वाढली तर निश्चितच भाजपचं संख्याबळ वाढेल अन् त्यांचाच पक्षाचा विधान परिषद सभापती होऊ शकतो.