Take a fresh look at your lifestyle.

Vande Bharat Train : मुंबई ते मराठवाडा प्रवास आता फक्त 5 तासांत ! पहा टाइम टेबल अन् तिकीट दर..

अयोध्या येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या 2 अमृत भारत एक्स्प्रेस आणि 6 वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. याचवेळी जालना येथेदेखील रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते जालना येथून मुंबईसाठी धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

या ट्रेनमुळे मराठवाड्यातून मुंबईपर्यंतचा प्रवास सुखकर आणी वेगवान होणार असल्याने जालनावासीयांमध्ये आनंदोत्सव पाहायला मिळाला.सध्या जालना येथून मुंबईला जाण्यासाठी सीएसएमटी – जालना जनशताब्दी एक्स्प्रेस ही वेगवान गाडी आहे. मात्र नव्या वर्षात या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सर्वांत वेगवान गाडी ठरणार आहे.

मुंबई – जालना हे अंतर वंदे भारत 5 तास 20 मिनिटांत पार करणार आहे. जनशताब्दीला हे अंतर पार करण्यासाठी 7 तास 45 मिनिटे लागतात. जालना – मुंबई वंदे भारत विशेष ट्रेनला एकूण 8 डबे देण्यात आले आहेत. दरम्यान, या ट्रेनसाठी तिकिटाचे दर 900 ते 1000 च्या आसपास असण्याची शक्यता आहे. लवकरच रेल्वेकडून याबाबत माहिती दिली जाणार असून 1 जानेवारीपासून हा रेल्वे प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

असे आहे वेळापत्रक.. 

जालना ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ रेल्वेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ही रेल्वे सकाळी 5 वाजून 05 मिनिटांनी जालना येथून निघेल, छत्रपती संभाजीनगरला ही रेल्वे 5 वाजून 53 ला पोहोचेल, मनमाडला 7.40 वाजण्याच्या दरम्यान पोहोचणार आहे. नाशिक रोडला 8.38 च्या दरम्यान, तर कल्याणला 10.55 च्या सुमारास पोहोचेल. नंतर ठाणे 11.10, दादर 11.32 आणि मुंबई सीएसटीएमला 11.55 ला पोहोचेल. दरम्यान, बुधवार वगळता आठवड्यातून सहा वेळा ही ट्रेन धावणार आहे.

पंतप्रधान आणि रेल्वेमंत्री यांचे महाराष्ट्राकडे लक्ष आहे. 90 टक्के विद्युतीकरण काम देशात पूर्ण झाले आहे विद्युतीकरण काम पूर्ण झाल्यावर आज जालनापर्यंत सुरू झालेली वंदे भारत ट्रेन नांदेडपर्यंत वाढवण्याचा मानस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप अभिनंदन आणि धन्यवाद. जालनावासीयांना देखील नव्या वंदे भारत ट्रेनसाठी शुभेच्छा !

– रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री