Take a fresh look at your lifestyle.

अस्मानी-सुल्तानी संकटात अन्न महामंडळाने तोंडचा घासही हिरावला ; ‘या’ 14 जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा गहू, तांदळाचा पुरवठा केला बंद…

शेतीशिवार टीम : 14 सप्टेंबर 2022 : अतिवृष्टी व महापुराच्या तडाख्याने विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे लाखो हेक्टरवरील पीक हिरावून घेतले. त्यामुळे शेतकरी संकटात असतानाच व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असतानाच राज्य सरकारने एपीएल योजनेतील गहू, तांदळाचा पुरवठा बंद करून तोंडचा घासही हिरावला आहे भारतीय अन्न महामंडळाने धान्य पुरवठा शक्य नसल्याचे कारण पुढे करून हात वर केले.

त्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांतील शिधापत्रिकाधारक कुटुंबांची चूल पेटणार कशी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आत्महत्या विदर्भ आणि राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्यात झाल्या आहेत.

शेतकरी आत्महत्येचे सत्र अजूनही थांबलेले नाही. अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने चिंताग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहे. जुलैपासून शेतकरी आत्महत्या वाढल्याचे दिसत आहे. दरम्यान, राज्य शासनाने पाच ते सहा वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एपीएल शेतकरी धान्य योजना सुरू केली होती.

त्यामध्ये विदर्भातील अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, तर नागपूर विभागातील वर्धा तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली , बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांचा समावेश केला होता.

येथील जवळपास आठ ते दहा लाख शिधापत्रिकाधारकांना भारतीय अन्न महामंडळाकडून प्रतिव्यक्ती पाच किलो गहू व तांदळाचा पुरवठा करण्यात येत होता. ही योजना सुरळीत सुरू असतानाच भारतीय अन्न महामंडळाने गहू उपलब्ध होत नसल्याने पुरवठा शक्य नाही, असे म्हणत जुलैपासून धान्य पाठवणे बंद केले.

त्यामुळे शेतकऱ्यांना दोन महिन्यांपासून गहू मिळणे बंद झाले. तांदळाचा पुरवठा होत असतानाच भारतीय अन्न महामंडळाने आता सप्टेंबरपासून तांदूळ पुरवठाही शक्य नाही, असे सांगून गव्हापाठोपाठ तांदळाचाही पुरवठा बंद केला आहे.

यावर्षी पावसाने राज्यभरात हाहाकार माजवला आहे. विदर्भ व मराठवाड्यात संततधार पावसासह अतिवृष्टीने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यांत नुकसान करणारा पाऊस सप्टेंबर महिन्यातही कहर करत आहे.