मुंबई – अहमदाबाद रेल्वे कॉरिडॉर (MHRC) साठी गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा आणि नगर हवेली येथे भूसंपादनाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने ही माहिती दिली.
मुंबई – अहमदाबाद रेल्वे कॉरिडॉर हा बुलेट ट्रेन प्रकल्प म्हणूनही ओळखला जातो. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘एक्स’ वर भूसंपादनाबाबत माहिती देताना सांगितले की, प्रकल्पासाठी आवश्यक असलेली 1389.49 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.
ट्रॅक बेड टाकण्याचे काम झाले सुरू..
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान हायस्पीड रेल्वे लाईन बांधण्यात येत आहे. या प्रकल्पासाठीची सर्व कंत्राटे गुजरात आणि महाराष्ट्राला देण्यात आली आहेत, आत्तापर्यंत 120.4 किमी गर्डर्स टाकण्यात आले आहेत आणि 271 किमीचे खांब बसवण्यात आले आहेत.MHRC कॉरिडॉर ट्रॅक सिस्टीमसाठी जपानी शिंकनसेनमध्ये वापरलेले प्रबलित काँक्रीट (RC) ट्रॅक बेड टाकण्याचे काम सुरत आणि आनंद येथेही सुरू झाले आहे. भारतात पहिल्यांदाच जे – स्लॅब बॅलेस्टलेस ट्रॅक सिस्टीम वापरण्यात येत आहे..
या जिल्ह्यांमध्ये बांधण्यात आले पूल..
गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील जरोली गावाजवळ 12.6 मीटर व्यासाचा आणि 350 मीटर लांबीचा पहिला ‘माउंटन बोगदा’ अवघ्या 10 महिन्यांत पूर्ण झाला आहे. गुजरातमधील सुरत जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर 70 मीटर लांब आणि 673 मेट्रिक टन वजनाचा पहिला स्टील पूल बांधण्यात आला आहे. तसेच अशा 28 पैकी 16 पुलांचे बांधकाम विविध टप्प्यात पूर्णत्वाकडे गेलं आहे. मुंबई – अहमदाबाद रेल्वे कॉरिडॉरवरील 24 पैकी सहा नद्यांवर पुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यात पार (वलसाड जिल्हा), पूर्णा (नवसारी जिल्हा), मिंधोला (नवसारी जिल्हा), अंबिका (नवसारी जिल्हा), औरंगाबाद (वलसाड जिल्हा) वेंगानिया (नवसारी जिल्हा). यांचा समावेश आहे.
भारतातील पहिला रेल्वे बोगदा..
सध्या नर्मदा, ताप्ती, माही आणि साबरमती नद्यांवरील पुलाचे काम प्रगतीपथावर असून भारतातील पहिल्या 7 किलोमीटर लांबीच्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याचे कामही सुरू झाले आहे. हा बोगदा महाराष्ट्रातील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा दरम्यानच्या 21 किमी लांबीच्या बोगद्याचा एक भाग असून मुंबई HSR स्टेशनच्या बांधकामासाठी खोदकामही सुरू झाले आहे..
भारतातली पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार ?
गुजरातमधील वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, आनंद, वडोदरा, अहमदाबाद आणि साबरमती येथील HSR स्टेशन बांधकामाच्या विविध टप्प्यात आहेत. 1.10 लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु भूसंपादनाबाबत अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. सरकारने 2026 पर्यंत दक्षिण गुजरातमधील सूरत ते बिलीमोरा दरम्यान बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे..