शेतकरी दुष्काळी संकटात ! 7 हजारांची ज्वारी आली फक्त अडीच हजारांवर, पहा बाजारसमिती-निहाय ज्वारीचे लेटेस्ट दर..
राज्यात ठिकठिकाणी रब्बी हंगामातील पिकांची काढणी संपली असून ऊस गाळप हंगाम देखील संपत आला आहे. सध्या सर्वत्र पाणीटंचाई व मजुरांना रोजगाराची गरज असून, येत्या काही दिवसात बहुतेक जिल्ह्यांत जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची गरज निर्माण होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात माळशिरससह मंगळवेढा तालुक्यात खरीप व रब्बी हंगामात अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. रब्बी हंगामात मंगळवेढा तालुक्यात 34 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. अवेळी पडलेल्या पावसामुळे ज्वारीच्या पिकाला काही प्रमाणात जीवदान मिळाले होते त्यामुळे सध्या ज्वारीचे पीक बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे.
ज्वारीची काढणी संपली असून हरभरा, करडी यांची काढणी सुरू आहे. सध्या कडबा व ज्वारीच्या किमती अपेक्षेपेक्षा कमी झाल्या असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दोन महिन्यापूर्वी ज्वारीला 7,000 रुपये इतका दर होता. आता तो निम्म्यापेक्षा कमी झाला आहे.
सध्या ज्वारीचे दर 2800 ते 3500 रुपये इतके असून, कडबा विक्री 10 ते 14 रुपये प्रति पेंढीपर्यंत सुरू आहे.
तालुक्यात रब्बी हंगामात कमी पडलेल्या पावसामुळे गहू पिकाची पेरणी कमी झाल्याने यावर्षी गव्हाचे पीक भाव खाणार आहे. तालुक्यात जनावरांची संख्या मोठी असून सध्या दुधाचे दर 25 रुपयापर्यंत खाली आल्याने जनावरांना पोसणे अवघड झाले आहे. पशुखाद्य, चाऱ्याचे दर वाढले असताना दुधाचे दर मात्र घसरत आहेत.
चारा टंचाई जाणवू नये यासाठी शासनाने चारा पिके निर्मितीसाठी बियाणे दिले आहेत. तसेच कडब्याच्या चारा देखील यावर्षी मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यात शेतीची कामे संपली असून ऊस कारखान्यांचे पट्टे पडल्यामुळे मजूर गावाकडे परतले आहेत. सध्या मजुरांना रोजगारासाठी रोहयोची कोणतीही कामे सुरू नसल्याने मजुरांचे स्थलांतर होत आहे.
तसेच शेतीच्या पाण्याची बिकट अवस्था असून विहीर, बोअर, सार्वजनिक जलस्रोत यांनी तळ गाठला असून पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. उजनीत पाणी कमी असल्यामुळे उन्हाळी पाळी मिळण्याची शक्यता कमी असल्याने शेतकन्यांनी उन्हाळी पिके घेतली नाहीत. तालुक्यातील चार कारखान्यांनी सुमारे चौदा लाख 25 हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे.
भैरवनाथ शुगर, युटोपियन शुगर, आवताडे शुगर हे कारखाने बंद झाले असून, दामाजी शुगर 8 मार्चला बंद होणार आहे. एक तर अपुरा पाऊस असताना शेतकऱ्यांनी पिके जोपासली परंतु उत्पादित माल हाती आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
ज्वारीचे दर 7,000 वरुन अडीच हजारावर, पहा आजचे लेटेस्ट दर..
मंगळवेढा तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस झाल्याने ज्वारीचे क्षेत्र घटले. 29 हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली असून ज्वारीसह हरभरा, गहू पिकांची काढणी झाली –
गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी
मजुरांना रोजगार मिळावा मंगळवेढा तालक्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, जनावरांसाठी चारा डेपो मजुरांसाठी रोजगार हमीची कामे सुरू करून आधार द्यावा, तसेच तालुक्यातील शेतीच्या कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी तातडीने निधी देऊन योजना मार्गी लावावी.
प्रकाश काळुंगे , फटेवाडी