Take a fresh look at your lifestyle.

Marriage Age of Women : महिलांचं लग्नाचं वय 18 वरून 21 पर्यंत वाढवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला मंजुरी !

शेतीशिवार टीम,16 डिसेंबर 2021:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनी 2020 च्या भाषणात देशातील महिलांसाठी विवाहाचे किमान वय 18 वरून 21 करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. जवळपास वर्षभरानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या घोषणेची अंमलबजावणी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिलांसाठी लग्नाचे कायदेशीर वय वय 18 वरून 21 वर्षे करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. आता तो संसदेत मांडला जाणार आहे आणि मंजूर झाल्यास त्याचं कायद्यात रुपांतर होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर, आता सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 मध्ये सुधारणा आणणार आहे आणि परिणामी विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायदा, 1955 यांसारख्या वैयक्तिक कायद्यांमध्ये सुधारणा करणार आहे.

डिसेंबर 2020 मध्ये जया जेटली यांच्या नेतृत्वाखालील केंद्राच्या टास्क फोर्सने NITI आयोगाला सादर केलेल्या शिफारशींवर बुधवारची मंजुरी आधारित आहे. या टास्क फोर्सची स्थापना मातृत्वाचे वय, मातामृत्यू कमी करण्यासाठी अत्यावश्यक आणि पोषण सुधारण्याशी संबंधित बाबी तपासण्यासाठी करण्यात आली होती.

मुलींना कुपोषणापासून वाचवण्यासाठी त्यांचं योग्य वेळी लग्न होणे गरजेचं आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. सध्या, पुरुषांसाठी विवाहाचे किमान वय 21 आणि महिलांसाठी 18 आहे. आता सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करून त्याला एक स्वरूप देणार आहे.