Take a fresh look at your lifestyle.

निलेश लंके यांच्या लोकप्रियतेची नगर शहरात प्रचिती ! शहरातील प्रचारफेरीस नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद..

निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा बुधवारी नगर शहरात पोहचल्यानंतर काढण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान लंके यांच्या लोकप्रियतेची प्रचिती आल्याचे शिवसेनेचे संभाजी कदम यांनी सांगितले. गेल्या 1 एप्रिलपासून नीलेश लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू केली असून बुधवारी यात्रा नगर शहरात पोहचली.

प्रचार फेरीदरम्यान बोलताना शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचार फेरीस शहरातील जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

हा प्रतिसाद पाहता त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती येते. नगर शहरातून त्यांच्या विजयासाठी शिवसेना प्रयत्नशील असून शहरातून लंके यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून दिले जाणार आहे. नगर शहराच्या विकासासाठी लंके हे खासदार होणे गरजेचे आहे मतदारांनी त्यांना उत्स्फुर्त मतदान करावे असे आवाहन कदम यांनी केले.

माजी महापौर अभिषेक कळमकर म्हणाले नगर शहरात आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत सध्याच्या खासदाराने काहीही कामे केली नसल्याने आपणास काम करणारा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे. नीलेश लंके यांनी आपल्या आमदारकीच्या काळात पारनेरमध्ये जी विकास कामे केली त्याच पध्दतीने नगर दक्षिण मतदारसंघातही काम करणारा खासदार झाला पाहिजे. त्यासाठी लंके हेच योग्य उमेदवार असल्याचे कळमकर म्हणाले.

काँग्रेसचे किरण काळे म्हणाले, लोकप्रतिनिधी कसा असावा हे निलेश लंके यांनी दाखवून दिले आहे. खासदार म्हणून जनतेने त्यांना स्विकारले आहे हे संपुर्ण मतदारसंघातून त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादावरून दिसत आहे. जनता लंके यांच्या पाठीशी उभी असून प्रचार फेरीस मिळत असलेला प्रतिसाद तेच अधोरेखीत करत आहे. लंके यांच्या विजयासाठी सर्वच पक्ष सरसावले आहे. लंके यांच्या विजयात काँग्रेसचा मोठा वाटा असेल असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.

रॅलीचा शुभारंभ दिल्लीगेट येथून होऊन प्रभाग क्र. 8 ते 13 मधील कल्याण रोड, आदर्शनगर, वारूळाचा मारूती, बालिकाश्रम रोड, तोफखाना, बागडपट्टी, सर्जेपुरा, तेलीखुंट, चितळे रोड, नेता सुभाष चौक चौपाटी कारंजा, नालेगांव, गाडगीळ पटांगण पटवर्धन चौक, लक्ष्मी कारंजा, नवी पेठ, कापड बाजार, गंज बाजार, दाळ मंडई, मंगल गेट, झेंडी गेट, हातमपुरा, रामचंद्र खुंट, बुरूडगल्ली, माणिक चौक, पंचपीर चावडी, कौठीची तालिम मार्गे माळीवाडा येथे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात सकाळच्या सत्राचा समारोप झाला.

प्रचार फेरीदरम्यान नवीपेठ येथील पुरातन श्रीराम मंदिरात लंके व सहकाऱ्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, आपचे भरत खाकाळ, युवा सेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर , अशोकराव बाबर, संजय शेंडगे, नलिनी गायकवाड , आशा निंबाळकर, संजय झिंजे, गणश कवडे, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, सुरेश तिवारी, शिरीष जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.