ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका अर्थाने लॉटरीच लागली आहे. कोरोनाच्या काळात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रूग्ण सेवा केली. याची दखल घेऊन शासनाने त्यांना कायम करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला.
जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत 748 अधिकारी, कर्मचारी काम करतात. हे अधिकारी, कर्मचारी एवढे दिवस मानधनावर काम करीत होते. परवा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या व ज्यांनी सेवेची दहा वर्ष पूर्ण केली, त्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
लातूर जिल्ह्यातील 748 पैकी 359 अधिकारी, कर्मचारी सेवेत कायम होण्यास पात्र ठरले आहेत.
लातूर लातूर जिल्ह्यातील 359 आरोग्यातले अधिकारी, कर्मचारी कायम होणार आहेत. शासनाकडून कायम करण्याचे निर्देश आल्यानंतर प्रक्रिया सुरू होईल.
राष्ट्रीय आरोग्य अभियानात आरोग्य सेविका , स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट एलएचव्ही स्टाफ, वैद्यकीय अधिकारी, योगा अँड नॅचरोपॅथी थेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी (आयुष), पॅडेट्रियशन डीईओ, ब्लड बँक टेक्निशियन, स्टॅटीस्टिकल, आया, स्वीपर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा अकाउंट व्यवस्थापक, उपाभियंता, कार्यक्रम सहाय्यक अशा पदांवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येणार आहे.
या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कायम करताना शासनाने फक्त सेवा दहा वर्ष झालेली असावी, अशी अट घातली आहे. शासनाच्या कायम करण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी, कर्मचाऱ्यांत हशी – खुषीचे वातावरण पसरले आहे.
शासन निर्देशानुसार कार्यवाही लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात 748 अधिकारी – कर्मचारी काम करीत आहेत. यातील 359 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दहा वर्ष सेवा पूर्ण केली. त्यांना आता शासन निर्देशानुसार, काम करण्याची प्रक्रिया आम्ही करणार आहोत.
– डॉ. एच. व्ही. वडगावे, डीएचओ, जि. प. लातूर..