ठाणे ते पडघा दरम्यान एलिव्हेटेड रोड तयार करण्यात येणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून शिर्डी किंवा नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना भविष्यात वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार नाही. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक समस्या संपवण्यासाठी सरकारने ठाणे ते पडघा दरम्यान 30 किलोमीटर लांबीचा उन्नत रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा उन्नत रस्ता सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग – 3 म्हणजेच मुंबई – नाशिक महामार्गावर बांधला जाणार आहे.

ठाण्यात बांधण्यात येणारा एलिव्हेटेड रोड हा राज्यातील सर्वात लांब एलिव्हेटेड रोड असणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) एलिव्हेटेड रोडसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. DPR तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या काही महिन्यांत सध्याच्या रस्त्यावर रस्ता तयार करण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

या समस्येवर निघणार तोडगा..

नाशिककडून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना भिवंडी बायपास आणि पडघाजवळ भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सध्या भिवंडीजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. भिवंडीजवळ अनेकवेळा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामध्ये वाहनचालकांचा वेळही वाया जातो.

एलिव्हेटेड रोडची का पडली गरज..

मुंबई ते नागपूर अंतर कमी करणारा समृद्धी महामार्ग 2024 पर्यंत पूर्णपणे तयार होईल. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग भिवंडीजवळील नाशिक महामार्गाला जोडणार आहे. अशा स्थितीत संपूर्ण समृद्धी महामार्ग खुला झाल्याने राष्ट्रीय महामार्ग-3 आणि समृद्धी महामार्गाची वाहने एकत्र आल्याने ठाण्याजवळील वाहतुकीची समस्या आणखी वाढू शकते. 

 

भविष्यात संभाव्य वाहतूक समस्या सोडवण्यासाठी सरकारने या दिशेने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून ठाण्याच्या पलीकडे समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी वाहनांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. गेल्या काही वर्षांपासून सरकार आर्थिक विकासासाठी मुंबई – नाशिक कॉरिडॉर विकसित करत आहे.

हा 30 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रोड तयार झाल्यानंतर वाहनांना रहदारीत न अडकता पडघा ते ठाण्याकडे जाता येणार आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस – वेचा विस्तार ठाण्यातील आनंद नगरपर्यंत करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 30 किमी लांबीच्या एलिव्हेटेड रोडवरून उतरून आणि प्रस्तावित ईस्टर्न एक्स्प्रेस – वेच्या विस्तारावरून प्रवास करून प्रवासी सहजपणे दक्षिण मुंबईत पोहोचू शकतात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *