केंद्राचा गॅस तर आता राज्यसरकारचा वीज दरवाढीचा महाशॉक ; आता, प्रति युनिट ‘इतके’ जास्त मोजावे लागणार पैसे !

0

शेतीशिवार टीम : 9 जुलै 2022 :- केंद्र शासनाच्या महागाईने सर्वसामान्य जनता होरपळत असताना आता राज्यानेही मोठा झटका दिला आहे. महावितरणने इंधन समायोजन शुल्कात (FAC) मोठी वाढ केली आहे. त्यामुळे महावितरण म्हणजेच (MSEDCL) ने वीज दरात वाढ केल्याने आता ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त वीजबिल भरावे लागणार आहे. प्रत्यक्षात एफएसी (FAC) वाढल्याने आता विजेचे दर वाढले असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

वीज नियामक आयोगाने मान्य केलेल्या वीजखरेदीच्या अतिरिक्त खर्चानुसार इंधन समायोजन आकाराच्या वसुलीला परवानगी दिल्याने महावितरण, टाटा, अदानी वीज ग्राहकांच्या वीज बिलात प्रति युनिटमाये सरासरी 80 ते 90 पैसे वाढ होणार आहे.

जून महिन्याच्या बिलात ही वाढ लागू होईल. महावितरणच्या वीज ग्राहकांना इंधन समायोजन आकारामुळे प्रति युनिट सरासरी एक रुपया अधिक मोजावा लागणार आहे. दर महिन्याला राज्यभरातील सर्व ग्राहक मिळून एक हजार कोटी रुपये मोजावे लागतील…

या वाढीव वीज बिलामुळे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वीज ग्राहकांना 100 ते 200 रुपयांपर्यंत आर्थिक भार सोसावा लागणार आहे. जानेवारी 2022 ते एप्रिल 2022 दरम्यान वीज नियामक आयोगाने मान्य केलेल्या वीज खरेदीच्या खर्चापेक्षा झालेल्या अतिरिक्त खर्चाच्या वसुलीसाठी आकारण्यात येणाऱ्या इंधन समायोजन आकारणीसाठी 1 जुलै रोजी आयोगाने महावितरण, अदानी, टाटा या वीज कंपन्यांना परवानगी दिली आहे.

घरगुती ग्राहकांसह सर्व स्तरातील वीज ग्राहकांना हा इंधन समायोजन आकार लागू करण्यात आला असला तरीही प्रत्येक वर्गवारीनुसार आणि ग्राहकांच्या वीज वापरानुसार आकाराचे शुल्क कमी अधिक प्रमाणात असणार आहे.

जानेवारी ते एप्रिलदरम्यान कोळशातील घट, वीजटंचाई व अन्य कारणांमुळे लघु कालावधीतील वीज खरेदीचे दर अतिरिक्त आकारण्यात आले होते. वीजखरेदीचे ठरवण्यात येणारे दर हे काही महिन्यांसाठीच लागू असल्याने काही वेळेस इंधन समायोजन आकार कमी, तर कधी अधिक असतो.

अप्रत्यक्षपणे ग्राहकांच्या वीजदेयकात समाविष्ट झाल्याने तो ग्राहकांकडूनच आकारण्यात येतो. महावितरणला इंधन समायोजन आकार स्थिरीकरण निधीपोटी 1500 कोटी रुपये मर्यादेपर्यंत रक्कम मान्य करून देण्यात आली असून ती 5 महिन्यांत वसूल करणे अपेक्षित आहे.

ग्राहकांच्या वीजवापरानुसार आकारणी लागू करण्यात येणार असून अदानी ग्राहकांना प्रतियुनिट सरासरी 92 पैसे, तर टाटाच्या 1 रुपया 20 पैसेपैकी 1 रुपया 5 पैसे व उर्वरित पुढील महिन्यांमध्ये वसुली करण्यासाठी वीज नियामक आयोगाने परवानगी दिली आहे.

जानेवारी 2022 मध्ये महावितरणने प्रति युनिट 25 पैशांनी दर वाढवले ​​होते. त्यानंतरही महावितरणने (महावितरण) FAC चे कारण दिले होते.

वीज बिल किती वाढणार ?

इंधन समायोजन शुल्कातील वाढ पुढीलप्रमाणे :-

0 ते 100 युनिट :- पूर्वी 10 पैसे होते, आता 65 पैसे
101 ते 300 युनिट :- पूर्वी 20 पैसे होते, आता 1 रुपया 45 पैसे
301 ते 500 युनिट्स :- पूर्वी ते 25 पैसे होते, आता 2 रुपये 05 पैसे
501 पेक्षा जास्त युनिट्स :- पूर्वी ते 25 पैसे होते, आता 2 रुपये 35 पैसे

कशी होईल वाढ :-

सध्याचे बिल नवे बिल
₹ 500 ₹ 580
₹1,000 ₹ 1,200
₹1,500 ₹ 1,700

विशेष म्हणजे वाढत्या महागाईचा सामना करत असलेल्या कोरोना विषाणूच्या साथीतून जनता अद्याप सावरलेली नाही. इंधनाच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.

शिवाय, आधीच महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर विजेच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे दुहेरी फटका बसणार आहे. अलीकडे गॅसच्या दरातही 50 रुपयांनी वाढ झाली आहे. सातत्याने वाढणाऱ्या महागाईने आता सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.