राज्यात उकाडा आणि तापमानाने तीशी पार केलेली असताना पुन्हा ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविली आहे. विदर्भ व मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी हिंगोली अश्या 15 जिल्ह्यात, दि.25 ते 29 फेब्रुवारी (रविवार ते गुरुवार) पर्यंतच्या 3 दिवसात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे.
कुठे पडणार थंडी आणि पाऊसही ?
महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली तसेच कोकणातील रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग अशा 9 जिल्ह्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दि .26 ते 28 फेब्रुवारी (सोमवार ते बुधवार) पर्यंतच्या 3 दिवसात पहाटेच्या किमान तापमान 14 तर कमाल 30 ते 32 डिग्री से ग्रेड दरम्यान जाणवत आहे.
दरम्यान, केवळ दोनच दिवस खान्देश नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 10 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी गडगडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ पावसाची आहे.
तापमान जवळपास सरासरी इतके किंवा त्याखाली जाणवत आहे. महाराष्ट्रातील उर्वरित 27 जिल्ह्यात हे तापमाने काहीसी अधिक असुन ती 17 व 34 डिग्री से. ग्रे. दरम्यान जाणवत आहे.
पावसाची शक्यता कशामुळे ?
फेब्रुवारी अखेर सध्याच्या हिवाळी हंगाम संपून पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरु होण्याचा संक्रमणाचा हा काळ असतो. साधारणपणे पूर्वमोसमी हंगामात पूर्व मध्य प्रदेश ते तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पूर्व किनारपट्टी समांतर वक्रकार हवेच्या कमी दाबाचा आस किंवा वारा खंडितता प्रणाली दिसू लागतात.
या आस किंवा पट्ट्याच्या पश्चिमेला उत्तरेकडून पूर्वेला दक्षिणेकडून तर आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या मिलनातून गडगडाटीसह वीजा गारांचा पाऊस कोसळत असतो. सध्या अशीच हवेच्या कमी दाबाचा आस सहित वारा खंडितता प्रणाली असुन बं. उ. सागरातील उच्च हवेच्या दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यातून आसाच्या पूर्वेला दक्षिणेकडून तर पश्चिमेला उत्तेकडून एक किमी. उंचीपर्यंत वारे वाहत आहेत. त्यामुळे फक्त विदर्भ मराठवाड्यातील 15 जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.