Take a fresh look at your lifestyle.

डॉ. सुजय विखेंच्या संपत्तीपुढे लंके मात्र कुठेच नाही ! विखेंच्या संपत्तीत कोट्यवधींची वाढ, तर लंकेंची संपत्ती 35 लाखांनी घटली..

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार खा. डॉ. सुजय विखे व नीेलश लंके यांच्या मालमत्तेमध्ये कमालीचा फरक दिसून येतोय. दोन्ही उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून विखेंची मालमत्ता वाढल्याचे तर नीलेश लंके यांची मालमत्ता घटल्याने नीलेश लंके हे सर्वसामान्यांसाठी स्वतःची पदरमोड करून सेवाभाव करीत असल्याचे कागदोपत्री स्पष्ट झाले आहे.

सुजय विखे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सुजय व त्यांची पत्नी धनश्री व यांच्याकडे २९ कोटी १८ लाख रूपयांची संपत्ती आहे. गत पाच वर्षात त्यांची संपत्ती १२ कोटी ३२ लाख रूपयांनी वाढली आहे. सुजय यांच्याकडे ५४१ ग्रॅम सोने असून त्याचे बाजारमुल्य ३५ लाख ३३ हजार ५१३ रूपये इतके आहे. पत्नी धनश्री यांच्याकडे ६९० ग्रॅम सोने असून त्याचे बाजारमुल्य ४५ लाख १० हजार १०१ रूपये इतके आहे.

नीलेश लंके व त्यांची पत्नी राणी यांच्याकडे स्थावर मालमत्ता १९ लाख २२ हजार २१० तर जंगम मालमत्ता २३ लाख ३२ हजार २२६ इतकी आहे. लंके यांच्या मालमत्तेमध्ये ३५ लाख २४ हजार २९५ रूपयांची घट झाली आहे. लंके यांच्यावरील कर्ज ३७ लाख ४८ हजार ७५७ इतके असून ते २०१९ च्या तुलनेत ते वाढले आहे.

नीलेश लंके यांच्याकडे १ लाख ४७ हजार १०० रूपये किमतीचे २० ग्रॅम सोने तर राणी लंके यांच्याकडे २ लाख ६ हजार २५०रूपयांचे ३० ग्रॅम सोने आहे.
सुजय विखे यांची बँक ठेव ५ कोटी ५७ लाख रूपये तर धनश्री विखे यांची बँक ठेव १ कोटी ९१ लाख इतकी आहे. दुसरीकडे नीलेश लंके यांच्याकडे ७ लाख ७६ हजार ८९६ रूपये तर राणी लंके यांच्याकडे ३१ हजार ८३४ रूपये इतकी ठेव आहे.

सुजय विखे यांची शेअर्स, म्युच्युअल फंडमध्ये ११ लाख ६ हजार इतकी गुंतवणूक आहे तर धनश्री यांची ८७ हजार इतकी गुंतवणूक आहे. दुसरीकडे दाम्पत्याची २० हजार ९१० रूपयांची सहकारी संस्थांमध्ये गुंतवणूक आहे.

कर्जाच्या बाबतीत सुजय विखे यांच्यावर ४ कोटी ६५ हजार रूपयांचे तर धनश्री यांच्यावर १ कोटी ४७ लाखांचे कर्ज आहे. नीलेश लंके यांच्यावर ३७ लाख ४८ हजार ७५७ रूपयांचे कर्ज आहे. राणी लंके यांच्यावर मात्र काहीही कर्ज नाही.

सुजय विखे यांच्याकडे २६ एकर जमीन आहे, धनश्री यांच्याकडे २७ एकर जमीन तर नीलेश लंके यांच्या नावे केवळ १० गुंठे जमीन आहे.सुजय विखे यांचा आयुर्विमा १३ लाख ५६ हजार, धनश्री यांचा ७८ हजार तर नीलेश लंके व राणी लंके यांची विमा तरतुद शुन्य आहे.

सुजय विखे व धनश्री विखे यांच्यावर एकही सामाजिक गुन्हा दाखल नसताना नीलेश लंके यांच्यावर मात्र कांदा निर्यात बंदी उठविण्यासाठी सुपे, ता. पारनेर येथे केलेल्या रस्ता रोको आंदोलनाचा गुन्हा दाखल आहे.